Sun, May 26, 2019 16:55होमपेज › Goa › ‘एस. दुर्गा’ संबंधी अहवाल मंत्रालयाकडे : रवैल

‘एस. दुर्गा’ संबंधी अहवाल मंत्रालयाकडे : रवैल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

48व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात (इफ्फी) वादग्रस्त चित्रपट ‘एस. दुर्गा’ सोमवारी संध्याकाळी भारतीय पॅनोरमा विभागाच्या परीक्षक मंडळाच्या परीक्षकांनी पाहिला असून यासंबंधीचा अहवाल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. या पुढील जो काही निर्णय असेल तो मंत्रालय न्यायालयात सांगणार आहे, असे परीक्षक मंडळाचे अध्यक्ष राहुल रवैल  यांनी पत्रकारांना सांगितले. 

राहुल रवैल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कला अकादमीच्या ‘ब्लॅक बॉक्स’ जवळच्या खास कक्षात भारतीय पॅनोरमा विभागाच्या परीक्षकांनी एस.दुर्गा पुन्हा पाहिला. ‘एस. दुर्गा’ चित्रपटाचे प्रदर्शन केवळ ज्युरी सदस्यांसाठी ठेवण्यात आले होते.  इफ्फीचे प्रतिनिधी किंवा पत्रकार आत प्रवेश करतील, अशी शक्यता गृहित धरून दोन पोलिस शिपाई  तसेच ‘बाऊन्सर्स’प्रवेशद्वारावर तैनात  करण्यात आले होते. 

परीक्षक मंडळांचे अध्यक्ष राहुल रवैल हे रात्री 9.30 च्या सुमारास काही कामासाठी बाहेर आले असता, पत्रकारांच्या प्रश्‍नावर, ते म्हणाले की, परीक्षक मंडळाने निर्णय घेतला असून तो अहवाल दिल्लीला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पाठवला आहे. सदर विषय न्यायालयात असल्याने त्याबाबत आपण अधिक काही बोलू शकत नाही. यावर मंत्रालयाकडून न्यायालयात आपले म्हणणे मंगळवारी सादर केले जाण्याची शक्यता आहे. 

परीक्षक मंडळातील सदस्य बदलले 

एकूण 13 सदस्यीय परीक्षक मंडळातील तिघांनी राजीनामा दिला होता. माहिती व प्रसारण मंत्रालयाने तातडीच्या हालचाली करून नव्याने तीन परीक्षकांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्‍ती करून सदर परीक्षणाची प्रक्रिया पार पाडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, हे तीन नवे परीक्षक कोण आणि नेमके किती परीक्षक या चाचणीच्या वेळी हजर होते, याची माहिती मिळू शकली नाही.