Mon, Mar 25, 2019 02:57
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › रॉयल्टी भरलेल्या खनिज वाहतुकीस मुभा हवी 

रॉयल्टी भरलेल्या खनिज वाहतुकीस मुभा हवी 

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 1:27AMपणजी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.4) दिलेल्या अंतरिम आदेशाचा लाभ याचिकादार खाण मालकांनाच  मिळणार असल्याने राज्यातील अन्य खाण मालकांचा माल तसाच पडून राहणार आहे. याचिकादार कंपन्यांशिवाय अन्य कंपन्यांच्या रॉयल्टी भरलेल्या खनिज मालाच्या वाहतुकीलाही मुभा मिळावी,  यासाठी सरकार प्रयत्नशील असून, या मुद्द्यावर अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांचा सल्ला घेण्याचे त्रिमंत्री सल्लागार समिती ठरविले आहे, असे नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. 

सेझा गोवा व फोमेंतो या खाण मालकांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने  दिलेल्या नव्या आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात त्रिमंत्री सल्लागार समितीची गुरुवारी बैठक  झाली. या बैठकीनंतर मंत्री सरदेसाई  पत्रकारांशी 
बोलत होते.ते  म्हणाले,  सर्वोच्च  न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे याचिकादारांनाच काही अंशी दिलासा मिळाला असून जेटीवर साठवून ठेवलेल्या तसेच बार्जमधील खनिजाची वाहतूक सुरू  करण्यात आली आहे. मात्र, रॉयल्टी भरलेल्या पण लीज क्षेत्राबाहेर खनिज असलेल्या अन्य खाण मालकांनाही खनिज वाहतूक करण्याची संधी मिळावी, यासाठी त्रिमंत्री सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जे खाण मालक न्यायालयात गेले नव्हते, मात्र त्यांचीही स्थिती याचिकादार खाण मालकांसारखीच आहे,   त्यांनाही समान न्याय मिळायला हवा, अशी सरकारची भूमिका आहे. 

राज्यातील काही खाण मालकांचा  अनेक जेटींवर खनिज माल खाणबंदी आदेश लागू होण्यापूर्वी काढून ठेवण्यात आला आहे. या मालासाठी सरकारला खाण मालकांनी रॉयल्टीही भरली आहे. सदर खनिज मालाची वाहतूक करून बार्जमध्ये भरण्याची संधी सरकारने या खाण मालकांना द्यायला हवी, असे त्रिमंत्री  सल्लागार समितीने ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले.

Tags :  Goa, Royalty, filled, mineral, transport, free