Sat, Feb 23, 2019 08:11होमपेज › Goa › रॉय नाईक यांना समन्स

रॉय नाईक यांना समन्स

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 11:36PMपणजी : प्रतिनिधी

पोलिस, ड्रग्ज माफिया, राजकारणी यांच्यातील साटेलोटे प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) फोंड्याचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांना  समन्स बजावून चौकशीसाठी येत्या शुक्रवारी (दि.29) हजर राहण्यास सांगितले आहे.

रॉय नाईक यांना शुक्रवार दि.29 रोजी सकाळी 11 वा. रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले असल्याची माहिती एसआयटीच्या  सूत्रांनी दिली.  पोलिस, ड्रग्ज माफिया, राजकारणी  साटेलोटेप्रकरणी सरकारने स्थापन केलेल्या सभागृह समितीच्या अहवालाच्या आधारे रॉय यांना हे समन्स बजावले आहे. आमदार मिकी पाशेको यांच्या अध्यक्षतेखाली ही सभागृह समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालाच्या आधारे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाने एसआयटीची स्थापना केली आहे. याप्रकरणी रॉय नाईक यांच्यासह काही राजकारणी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. 

रॉय यांची चौकशी करण्यासाठी एसआयटीकडून प्रश्‍नांची यादी तयार करण्यात आली आहे. रॉय यांच्यानंतर आणखी काही जणांनाही एसआयटी समन्स बजावून चौकशीसाठी बोलावू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.