Sun, Apr 21, 2019 02:30होमपेज › Goa › 100 शाळांमध्ये ‘रस्ते सुरक्षा’ अभ्यासक्रम 

100 शाळांमध्ये ‘रस्ते सुरक्षा’ अभ्यासक्रम 

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 11:48PMपणजी : प्रतिनिधी

रस्ते सुरक्षेसंदर्भातील अभ्यासक्रम राज्यातील 100 शाळांमध्ये लागू करण्याचा निर्णय सोमवारी  राज्य रस्ते  सुरक्षा  मंडळाच्या पर्वरी येथील सचिवालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शाळकरी विद्यार्थ्यांची  क्षमतेपेक्षा  जादा  वाहतूक करणार्‍या  खासगी वाहनांवर  कारवाई करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी  दिली.वाहतूक खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक पोलिस, आरोग्य खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ,  तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे  प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. वर्षातून दोनदा राज्य रस्ता सुरक्षा  मंडळाची बैठक होते. मोटर वाहन कायद्यांतर्गत हे मंडळ स्थापन करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतूक  संचालक देसाई म्हणाले की, मंडळाच्या या बैठकीत रस्ता अपघातांच्या संख्येत  घट, रस्त्यांच्या स्थितीत सुधारणा करणे यावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर रस्ता सुरक्षा हा विषय महत्त्वाचा असून त्यासंदर्भातील अभ्यासक्रम राज्यातील 100 शाळांमध्ये लागू करावा, असा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.रस्ता सुरक्षेचा अभ्यासक्रम लागू करणारे गोवा हे देशातील कदाचित पहिले राज्य ठरणार आहे. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम येत्या ऑगस्ट महिन्यापासून लागू केला जाईल. शिक्षण खात्याकडून हा अभ्यास्क्रम तयार करण्यात आला असल्याचे  त्यांनी सांगितले.

शाळकरी मुलांची वाहतूक सुरक्षित असण्यासंदर्भात सर्वोच्च  न्यायालयाने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. मात्र, काही खासगी वाहने   या विद्यार्थ्यांची वाहतूक क्षमतेपेक्षा जादा करीत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होतो. याबाबत  उपस्थितांनी चिंता व्यक्‍त केली आहे. त्यानुसार असा प्रकार आढळल्यास त्यावर कारवाई करावी, असे संबंधित यंत्रणेला निर्देश देण्ययात आल्याचेही ते म्हणाले.राज्यात रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणार्‍यांच्या संख्येत घट झाली आहे. यात आणखी घट व्हावी, यासाठी उपाययोजना करण्यावर मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.  राज्यातील 57   अपघातप्रवण क्षेत्रांची यादी बनवण्यात आली असून त्याठिकाणी  अपघात घडू नयेत, यासाठी आवश्यक ते फलक लावण्यात येणार आहेत, असेही देसाई यांनी सांगितले.