होमपेज › Goa › आंदोलन मागे घ्यावे

आंदोलन मागे घ्यावे

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:46AMपणजी : प्रतिनिधी

भाजपकडून खाणबंदीवर तोडगा काढण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याने  खाण अवलंबितांनी सोमवारी पणजीत  अांदोलन करू नये, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनय तेंडुलकर यांनी केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवारी रात्री 8 वाजता गोव्यात पोहोचणार असून रात्री भाजपचे आमदार व मंत्र्यांशी ते सविस्तर चर्चा करणार आहेत. दुसर्‍या दिवशी, मंगळवारी खाण मालक, खाण अवलंबित, ट्रक, बार्ज संघटनेचे प्रतिनिधी व अन्य घटकांशी गडकरी संवाद साधणार आहेत, असेही ते म्हणाले.    

येथील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेंडुलकर यांच्यासह  केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक तसेच आमदार फ्रान्सिस डिसोझा हजर होते. यावेळी तेंडुलकर म्हणाले, की याआधी गोव्यातून सर्वपक्षीय शिष्टमंडळ तसेच तिन्ही  खासदारांनी गडकरी यांची भेट घेऊन खाणबंदीच्या जनसामान्यांवर होणार्‍या परिणामांवर काहीतरी तोडगा काढण्याची विनंती केली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही भेटून गडकरी हे निवडणुकीच्या कालावधीत प्रभारी असल्याने त्यांना राज्यात पाठवण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन गडकरी गोव्यात दोन दिवसाच्या भेटीसाठी सोमवारी येणार आहेत. गडकरी यांच्या गोवा भेटीनंतर खाणबंदीवर योग्य तोडगा निघेल, अशी आशा आहे. गडकरी केंद्रीय मंत्री या नात्याने राज्यात आले असल्याने घटक पक्षाच्या आमदारांनी तसेच बिगर भाजप पक्षीय नेत्यांनीही त्यांना भेटण्यास हरकत नाही. 

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोवा एका विशिष्ट अशा संकटातून जात आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या हिताच्या दृष्टीने खाणी बंद होऊ नये म्हणून भाजप पक्ष आणि सरकार म्हणून प्रश्‍न सोडवण्याच्या प्रयत्नात आहेत. 

लिलाव हा एकमेव मार्ग असला तरी खाण महामंडळ निर्माण करावे, अशी सूचना काही आमदारांनी मांडली. काहींनी लिलावच योग्य असल्याचे मत मांडले. यावर नेमकी पक्षाची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तसेच खाण अवलंबित, खाण मालक, ट्रक, बार्ज व अन्य घटकांकडे विचारविनिमय करून निश्‍चीत केली जाणार असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले.  

खाण अवलंबितांच्या सोमवारी होणार्‍या आंदोलनात भाजपच्या एखाद्या आमदाराकडून पाठिंबा दिला गेला तरी त्या मोर्चात कुठलाही  भाजप आमदार सामील होणार नाही. तसेच मोर्चामुळे कसलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची काळजी सरकारकडून घेतली जाईल, असा  विश्‍वास तेंडुलकर यांनी व्यक्त केला.