Mon, Mar 25, 2019 05:30
    ब्रेकिंग    



होमपेज › Goa › पर्वरी आदर्श मतदारसंघ बनविण्यास सहकार्य करा

पर्वरी आदर्श मतदारसंघ बनविण्यास सहकार्य करा

Published On: Feb 05 2018 1:41AM | Last Updated: Feb 05 2018 12:00AM




पर्वरी : वार्ताहर 

गेली अनेक वर्षे आपण पर्वरी मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहे. पाणी, कचरा विल्हेवाट, सर्व्हिस रोड, मार्केट, क्रीडा मैदान या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले असून त्या बर्‍याच अंशी सोडविल्या  आहेत. पर्वरी हा एक आदर्श मतदारसंघ करण्याचे ध्येय उराशी बाळगून  कार्यरत आहे. आजपर्यंत लोकांनी  सहकार्य दिले असेच  पुढे द्यावे, असे आवाहन महसूल मंत्री रोहन खंवटे यांनी केले.

 पर्वरीतील रासिंग या संस्थेने आयोजित केलेल्या ‘साद संवाद’ या कार्यक्रमात मंत्री खंवटे बोलत होते.   व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर, वीज खात्याचे सहायक अभियंता अनिल कुमार, सार्वजनिक बांधकाम खाते सहाय्यक अभियंता  आर.एस.नाईक, उपनिरीक्षक निखील पालेकर, सरपंच स्वप्नील चोडणकर, पंचायत सदस्य श्याम कामत   उपस्थित होते. 

पर्वरी पंचायतक्षेत्र  परिसरात भटक्या कुत्र्यांचा  उपद्रव वाढला आहे. तसेच सर्व्हिस मार्गावर काही लोक दारू पिऊन बाटल्या फोडतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक  व महिलांना चालण्यास त्रास होत आहे.  अनेक वाहन चालक सिग्नल चुकविण्यासाठी सर्व्हिस मार्गाचा वापर करत असल्याने रहदारी वाढली आहे. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी  जलवाहिनीला ठिकठिकाणी लागलेली गळती थांबावयाला पाहिजे. ठिकठिकाणी गतीरोधक घालणे, दिशादर्शक फलक लावणे, बेकायदा घरे पाडणे या व यासारख्या  समस्या ग्रामस्थांनी  मंत्री खंवटे  यांच्यासमोर मांडल्या.

बेकायदेशीर घरांवर लगेच कारवाई केली जाणार आहे.तसेच सर्व्हिस मार्गावरील समस्या सोडविण्यासाठी पोलिसांना योग्य सूचना दिल्या आहेत. भटक्या कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी जागा घेतली असून तेथे त्यांना सर्व सोयी पुरविणार आहोत. पाण्यासाठी तात्पुरती टँकरची सोय करण्यात येईल. तसेच नव्या टाक्या आणि जुनी पाईपलाईन बदलण्याचे कामही सुरु करणार आहोत. स्वच्छ पर्वरी हरित पर्वरी करण्याचे ध्येय साकारण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री  खंवटे यांनी केले. 
 सुरज बोरकर यांनी सूत्रसंचालन केले व त्यांनीच आभार मानले.