होमपेज › Goa › अग्निशमन यंत्रणा बसवण्याची अधिसूचना मागे घ्या

अग्निशमन यंत्रणा बसवण्याची अधिसूचना मागे घ्या

Published On: May 29 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 11:09PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील सर्व  लहान- मोठी आस्थापने आणि व्यापारी संस्थांमध्ये  अग्निशमन यंत्रणा बसवण्याची सक्ती करणारी अधिसूचना   म्हणजे मोठा घोटाळा असून राज्य सरकारने ही अधिसूचना मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी केली आहे.येथील काँग्रेस भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुल्ला म्हणाले, की राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातर्फे 18 जानेवारी 2018 रोजी आस्थापने आणि दूकानात आग विझवण्यासाठी ‘फायर एस्टिंग्विशर’ बसवण्याची अधिसूचना सर्व नगरपालिकांना पाठवण्यात आली होती.

या अधिसूचनेनंतर, सुमारे चार महिन्यानंतर 17 मे 2018 रोजी दोन्ही जिल्हाधिकार्‍यांनी राज्यातील 50 चौरस मीटर वरील सर्व   दुकानांचा परवाना नूतनीकरण करताना अग्निशामक दलाचा ‘ना हरकत’ आणणे बंधनकारक करण्याची अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेमुळे गोव्यातील सर्व दुकानदारांना तसेच डॉक्टर, वकील सारख्या व्यावसायिकांचे परवाने नुतनीकरण स्थानिक पालिकांनी थांबवले आहे. सदर अधिसूचना केवळ काही ‘फायर एस्टिंग्विशर’ उत्पादन करणार्‍या कंपन्यांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आली असून हा एक प्रकारचा घोटाळा आहे.  सदर लहान ‘फायर एस्टिंग्विशर’ ची किंमत सुमारे 2500 असून हा नाहक भुर्दंड व्यापार्‍यांना सोसावा लागणार आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून अधिसूचना रद्द करावी अशी  मागणी   मुल्ला यांनी केली.