होमपेज › Goa › टोल आकारणी पुन्हा सुरू करा

टोल आकारणी पुन्हा सुरू करा

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 22 2018 12:28AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात विविध ठिकाणी करण्यात येत असलेली टोल आकारणी अचानकपणे बंद केल्याने त्याचा राज्याच्या महसूलावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा टोल आकारणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे उत्तर गोवा जिल्हाप्रमुख किशोर राव यांनी शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. महसूल उभारण्याच्यादृष्टीने पुन्हा टोल आकारणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी तसेच संबंधित खात्यांना निवेदन सादर केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राव पुढे म्हणाले की, सरकारने टोल आकारणीचा जेव्हा निर्णय घेतला होता, तेव्हा त्याला अनेकांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. परंतु, खाण व्यवसाय बंद झाल्याने महसुलात घट झाली आहे. त्यामुळे महसूल उभारणीसाठी टोल आकारणी करणे आवश्यक असल्याचे तेव्हा सरकारने सांगितले होते. मग आता अचानकपणे ही टोल आकारणी का बंद करण्यात आली, असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सरकारकडून अधुनमधून रोखे विक्रीस काढले जातात. यावरून  महसूलात घट होत असल्याचे स्पष्ट होते. मग असे असताना  ही टोल आकारणी बंद करण्याचा निर्णय अचानक का घेण्यात आला. टोल आकारणी बंद करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे. टोल नाक्यांवरून राज्यात पुलांचे बांधकाम साहित्य घेऊन येणार्‍या वाहनांना फायदा करून देण्यासाठी तर हा निर्णय घेण्यात आला नाही ना? तसे असल्यास ते पूर्णपणे अयोग्य असून सरकारने पुन्हा टोल आकारणी सुरू करावी, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सरकारने बांदा ते पोळे  या राष्ट्रीय महामार्गालगत मोबाईल टॉयलेट उभारावेत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणार्‍यांची गैरसोय होणार नाही, अशीही मागणी राव यांनी केली. यावेळी शिवसेनेचे नेते इर्फान खान उपस्थित होते.

 

Tags : goa, panaji news, toll charges,