Wed, Apr 24, 2019 22:00होमपेज › Goa › ‘हॉकिंग झोन’साठी‘सबयार्ड’ची जागा घेणार  

‘हॉकिंग झोन’साठी‘सबयार्ड’ची जागा घेणार  

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 14 2018 11:52PMम्हापसा : प्रतिनिधी

म्हापसा शहरात वाढत्या फेरी विक्रेत्यांवर नियंत्रण रहावे,याकरिता सबयार्डमध्ये फेरी विक्रेत्यांसाठी आणखी  5 हजार चौ. मी. जागा सरकारने पालिकेच्या ताब्यात द्यावी, असा  ठराव गुरूवारी  नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या  पालिका मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला. 

म्हापसा पालिका बाजारात दिवसेंदिवस फेरी विक्रेत्यांची संख्या वाढत असल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने यापूर्वी डाऊन टाऊन योजनेत 5 हजार चौ.मी. जागा फेरी विक्रेत्यांसाठी हॉकींग झोनकरिता उपलब्ध करावी, असा ठराव  संमत केला होता. या जागेव्यतिरिक्त सबयार्डमधील 5 हजार चौमी.जागा संपादित करण्याचा ठराव संमत करण्यात आला.यामुळे हॉकिंग झोनसाठी एकूण 10 हजार चौमी.जागेची तरतूद पालिकेने केली आहे.

या बैठकीत पालिकेच्या ताफ्यात आणखी  दोन ट्रक, एक कचरा वाहतूक ट्रक, एक जेसीबी मशीन व एक जीप ही वाहने सरकारकडून घेण्याचा ठराव मंजूर झाला. कुचेली येथे कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार कचरा प्रकल्पाची निविदा काढण्याचेही ठरले. माजी नगराध्यक्ष संदीप फळारी यांनी मागच्या पालिका मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तातील अनेक चुका नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्या व त्या   दुरुस्त केल्यानंतर इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली.

पालिका बाजारातील सात दुकानदारांच्या लीज धारकांकडून त्यांच्या नातलगांच्या नावावर नवीन लीज नूतनीकरणासाठी मान्यता देण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या पाहता पालिकेने आणखीन एक शववाहिका खरेदी करावी, अशी मागणी नगरसेवक तुषार टोपले यांनी  केली. त्यानंतर नगरसेवक टोपले यांनी ही शववाहिका खासदार निधीतून घेण्याचा ठराव मांडला  व तो संमत करण्यात आला. 

पालिकेतील काही ठेकेदार पालिकेची कामे घेतात व ती वेळेवर पूर्ण करत नाही किंवा दोन दोन वर्ष कामाला सुरुवात पण करत नाही, अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही टोपले यांनी केली.

गणेशपुरी ते सेंट झेवियर कॉलेजपर्यंतच्या भागात गाडेधारकांचे प्रस्थ वाढले असून त्यांना तातडीने तेथून हटवा. ही मागणी वेळेवर पूर्ण न झाल्यास आपण गणेशपुरीतील रहिवाशांना घेऊन पालिकेवर मोर्चा आणणार व वेळ पडल्यास या संदर्भात उच्च न्यायालयात धाव घेणार, असा इशारा  नगरसेवक मिशाळ यांनी दिला. नगरसेवक संदीप फळारी यांनी या प्रश्‍नावर हस्तक्षेप करताना सांगितले मुख्य अधिकार्‍यांपुढे या गाडेधारकांची सुनावणी चालू आहे. त्याचा निकाल मुख्यअधिकार्‍यांनी लवकरात लवकर लावावा व हा प्रश्‍न कायम स्वरुपी सोडविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांची ही  शेवटची बैठक असल्यामुळे नगरसेवकांनी  बैठक नगराध्यक्षांना सुरळीत चालविण्यास मदत केली. बैठकीला मुख्य अधिकारी क्लेन मदेरा व मुख्य अभियंता हुसेन शहा मुजावर उपस्थित होते.