Sun, Aug 18, 2019 14:32होमपेज › Goa › फार्मेलिनप्रकरणी मासळी वितरक, दलालांवर गुन्हे नोंदवा

फार्मेलिनप्रकरणी मासळी वितरक, दलालांवर गुन्हे नोंदवा

Published On: Jul 22 2018 1:02AM | Last Updated: Jul 22 2018 12:14AMमडगाव ः प्रतिनिधी

मासळीमध्ये फार्मेलिन आहे, ही माहिती असूनही मासळी गोव्यात पाठवणार्‍या वितरकांनी  आणि मासळी लोकांपर्यंत पोचवणार्‍या दलालांनी जाणूनबुजून सामान्य लोकांचा जीव धोक्यात घातला आहे. मडगावात सतरा ट्रक भरून फॉर्मेलिनयुक्‍त मासे घेऊन आलेल्या त्या अज्ञात मासळी दलाल आणि वितरकांविरोधात  गुन्हा नोंदवावा, अशा मागणीचे निवेदन अ‍ॅड.राजीव गोम्स यांनी शनिवारी फातोर्डा पोलिस स्थानकात सादर केले. 

पत्रकारांशी बोलताना गोम्स  म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माडेल येथील घाऊक मासळी बाजारात सतरा ट्रक भरून परराज्यातील मासळी आली होती. अन्न आणि औषध प्रशासनाकडून झालेल्या तपासणीत या मासळीत आरोग्याला घातक फार्मेलिन  आढळल्याचे सांगण्यात आले होते. त्याच मासळीची प्रयोगशाळेत चाचणी केली असता त्यात फार्मेलिन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मध्यंतरी मासळीच्या शरिरात नैसर्गिकरीत्या फार्मेलिन आहे, असेही जाहीर करण्यात आले. या विविध प्रकारच्या वक्‍तव्यांमुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

‘त्या’ सतरा ट्रक मासळीमध्ये फार्मेलिन आहे, हे उघड झाल्यानंतर ती मासळी गोव्यात आणणार्‍या दलाल आणि वितरकांवर गुन्हा     नोंदवण्याची गरज होती, तसेच हानिकारक मासळीची विल्हेवाट लावणेही गरजेचे होते.  अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी राजकीय दबावाखाली येऊन सदर मासळी आरोग्यासाठी हानीकारक नसल्याचे स्पष्ट करून मासळीची विक्री करण्याची परवानगी दिली, असा दावा अ‍ॅड. गोम्स यांनी केला.

फार्मेलिन असलेली मासळी गोव्यात आणणार्‍या वितरकांनी आणि सदर मासळी आरोग्यासाठी धोकादायक असून त्यामुळे लोकांचा जीव जाऊ शकतो, हे माहिती असूनही दलालांनी ती मासळी गोव्यात वितरित करून लोकांचा जीव धोक्यात घातला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविणे गरजेचे होते. मौलाना इब्राहिम याची चौकशी केल्यास त्या अज्ञात दलालांना आणि वितरकांना शोधणे शक्य होणार आहे, असे गोम्स म्हणाले. 

फार्मेलिन हा विषय लोकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. शिवाय भविष्यात फार्मेलिनविरहित मासळी गोव्यात यावी, यासाठी मासळी माफियांवर कारवाई होणे आवश्यक आहे. बंदी उठल्यानंतर पुन्हा फार्मेलिनचे मासे गोव्यात येऊ शकतात. या प्रकरणाचा मुळातून नायनाट करण्यासाठी या प्रकरणाची आताच चौकशी करावी. संशयित व्यक्तींविरोधात भा.दं.सं. कलम 120 ब, 272, 273, 420  अशा विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजीव गोम्स यांनी केली आहे.

गोम्स म्हणाले, फार्मेलिन हे रसायन मासळीच्या बाहेरच्या बाजूने वापरले जाते,   मासळी ताजी  ठेवण्याचा त्यामागे उद्देश आहे. वैज्ञानिक चाचणीत असे आढळून आले की, हे फार्मेलिन मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे.शिवाय अन्न पदार्थ विषयक मानक संस्थेच्या नियमाप्रमाणे ‘फार्मेलिन किंवा फॉर्मेल्डीहायड्र’हे रसायन   अन्नात मिसळणे नियमाने गुन्हा ठरतो. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकारी आयवा फर्नांडिस यांनी 12 जुलै रोजी परराज्यातून आलेल्या मासळीची तपासणी केली असता मासळीत फार्मेलिन असल्याचे सिद्ध झाले होते.त्यांनतर प्रयोगशाळेत प्रशासनाचे वरिष्ठ वैज्ञानिक चंद्रकांत कांबळी यांनी सादर मासळीची तपासणी करून त्यात फार्मेलिनचे प्रमाण  ‘पर्मिसीबील लिमिट’च्या आत असल्याचे म्हटले होते, असेही गोम्स म्हणाले.  या मासळीत मिथेनॉल हे घातक रसायन आढळण्याची पूर्ण शक्यता होती आणि ते सापडले असले तरी ते लोकांना कळू दिले नसते, असा दावा गोम्स यांनी केला आहे. फार्मेलिनबाबत  ‘पर्मिसीबील लिमिट’असे काही नसते.  मासळीमध्ये फार्मेलिन सापडणे याचा अर्थ ही मासळी आरोग्यासाठी हानिकारक आहे, असेच निदान होत असल्याचे गोम्स पुढे म्हणाले.