होमपेज › Goa › मराठी शाळांची तातडीने दुरुस्ती करा

मराठी शाळांची तातडीने दुरुस्ती करा

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 10:24PMकेरी : वार्ताहर

सत्तरी तालुक्यातील अनेक मराठी शाळांची दुरवस्था झाली असून या  शाळा जर येत्या शैक्षणिक वर्षापूर्वी दुरुस्त न केल्यास न्यायालयात दाद मागू, असा इशारा सत्तरीतील मराठी प्रेमींनी सोनाळ येथे झालेल्या मराठी प्रेमींच्या बैठकीत दिला. यावेळी अँड. शिवाजी देसाई, रणजित राणे, संदीप केळकर, मोहन कुलकर्णी, विठल कांबळी, बाबुराव पाटील, अँड. भालचंद्र मयेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अँड. शिवाजी देसाई म्हणाले की,  सरकारने मराठी शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे सत्तरीतील अनेक शाळांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे शाळा दुरुस्त करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलने आवश्यक आहे. मराठी शाळांच्या दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष ही चिंताजनक बाब आहे. मराठी शाळांना पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन उत्तम पायाभूत सुविधा मराठी शाळांसाठी निर्माण करून ठेवल्या पाहिजेत. मराठी शाळांची गुणवत्ता सुधारल्याखेरीज इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा उभ्या राहू शकणार नाहीत. इंग्रजी शाळांचा दुस्वास करण्याऐवजी त्यांच्यातील चांगले मराठी शाळांनी घेण्याची गरज आहे. मराठी शाळांमध्ये शिकवणार्‍या शिक्षकांची मुले इंग्रजी शाळेत शिकतात, हा विरोधाभास थांबत नाही, तोपर्यंत मराठी शाळांना चांगले दिवस येणार नाहीत. शिक्षकांकडून शिक्षणेतर कामे करून घेणे थांबविण्याची गरज आहे. सरकारने ही दुटप्पी वागणूक बंद करायला हवी, असे ते म्हणाले. लोक गप्प आहेत याचा अर्थ ते कारी करणार नाहित, असा होत नाही. त्यामुळे सरकारने आमच्या संयमाचे बांध फुटतील याची वाट पाहू नये, असेही ते म्हणाले. 

सरकारने जर मराठी शाळांची स्थिती सुधारली नाही तर मात्र आमच्याकडे न्यायालयात दाद मागण्या खेरीज दुसरा पर्यायच शिल्लक राहणार नाही.रणजित राणे यांनी सांगितले की, आज शिक्षण क्षेत्रात येणारी व्यक्ती खरोखरच या क्षेत्राची आवड असणारी आहे, की नाही याबाबत प्रश्न चिन्ह आहे. शिक्षकांची भरती करतेवेळी मुलाखती घेण्याची पद्धत आता बदलायला हवी.काही शिक्षक जमीन विक्रीच्या धंद्यात दलालांचे काम करतात. तसेच दुसरा व्यवसाय करतात, हे थांबले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

अँड. भालचंद्र मयेकर म्हणाले   की, आता सर्वांनी जागे होण्याची वेळ आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणसंदर्भात मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली आहेत. शाळा तात्काळ दुरुस्त न करणे हे मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आहे. त्यामुळे मानव अधिकार आयोगाकडे एक साधी याचिका टाकली तरी देखील शिक्षण खाते अडचणीत येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.संदीप केळकर म्हणाले की, शाळांचे वेळोवेळी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. शिक्षकांना निवडणुकीच्या कामांत गुंतवणे अयोग्य आहे. विठल कांबळी यांनी सांगितले की, कोणत्याही स्थितीत मराठी शाळा बंद पडता कामा नयेत. त्यामुळे मराठी शाळा टिकवण्यासाठी मराठीप्रेमींनी एकत्र येणे आवश्यक आहे. बाबुराव पाटील म्हणाले की, मराठी शाळांच्या रक्षणासाठी आता निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली आहे.सूत्रसंचालन विजय नाईक यांनी करून शेवटी त्यांनीच उपस्थितांचे आभार मानले. 

Tags : Goa, Repair,  Marathi, schools, promptly