Mon, Apr 22, 2019 03:45होमपेज › Goa › पोलिस संरक्षणात कचरा हटवू

पोलिस संरक्षणात कचरा हटवू

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 12:37AM
मडगाव : प्रतिनिधी 

अखिल गोवा कर्मचारी संघटनेने 29 जून रोजी पुकारलेल्या पालिका कर्मचार्‍यांच्या राज्यव्यापी संपात मडगाव पालिकेचा स्वच्छता विभाग सहभागी होणार नाही. पोलिस संरक्षणात कचरा हटवू, अशी भूमिका  मडगाव पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विराज आराबेकर यांनी घेतली असून संपाच्या दिवशी पालिका क्षेत्रातील कचरा हटवणार्‍या कामगारांना पोलिस संरक्षण पुरवावे, अशी मागणी  त्यांनी मुख्याधिकारी जॉन्सन फेर्नांडिस यांच्याकडे केली आहे.

दरम्यान,अखिल गोवा कर्मचारी संघटनेने आयोजित केलेला संप यशस्वी करण्यासाठी संघटनेने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या तीन दिवसांपासून मडगाव पालिकेच्या बाहेर कर्मचारी जमून घोषणाबाजी करत आहेत.   विरोधी गटातील कर्मचार्‍यांची  बुधवारी पालिका कार्यालयाबाहेर बैठक झाली. एक गट घोषणाबाजी करत असता स्वच्छता निरीक्षक विराज आराबेकर यांनी आपल्या कामगारांची बैठक घेऊन त्यांना संपाच्या दिवशी कचरा उचलण्याचे आवाहन केले. संपाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण मुख्याधिकारी जॉन्सन फेर्नांडिस यांच्याशी चर्चा करून संपाच्या दिवशी पोलिस सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे, असे आराबेकर यांनी सांगितले. कोणत्याही स्थितीत संपाच्या दिवशी कचरा उचलला जाणार आहे. त्यासाठी पोलिस संरक्षण घेतले जाईल, असेही  ते  म्हणालेे.

आराबेकर म्हणाले की, गेले कित्येक महिने आपण संघटनेच्या निधीची चौकशी संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडे करत आहोत, दर महिन्यालाकर्मचार्‍यांच्या पगारातून पन्नास रुपये कापले जातात. त्याचा कर्मचार्‍यांना कोणताच लाभ होत नाही. ज्या बँक खात्यात हे पैसे जमा होतात, त्याचे अधिकार अनिल शिरोडकर या निवृत्त अधिकार्‍याकडे आणि अध्यक्ष केशव प्रभू यांच्याकडे आहेत. खात्यातील पैशांविषयी कोणतीच माहिती त्यांच्याकडून दिली जात नसून हा आर्थिक व्यवहार संशयास्पद  आहे.हे निवृत्त कर्मचार्‍यांचे युनियन नसून पालिका कर्मचार्‍यांची संघटना आहे.खात्यावरील पैसे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गरजेसाठी वापरले जाणे आवश्यक आहे. सध्या कार्यरत असलेली संघटना स्वतःच्या स्वार्थासाठी कामगारांना वेठीस धरू पहात आहे, असेही आराबेकर म्हणाले.

संघटनेच्या खात्यातील निधी बरोबर आणखी अनेक विषय आहेत, ज्यातून विद्यमान पदाधिकार्‍यांचा स्वार्थ दिसून येतो,असे सांगून या संघटनेने मडगाव नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी ज्यांची निवड केली आहे त्याला खाते हाताळण्याचे अधिकार द्यावेत, असे आराबेकर म्हणाले.