Mon, Jun 24, 2019 21:01होमपेज › Goa › पीडीएतून गावे वगळल्याची अधिसूचना काढा : आर्थुर डिसोझा 

पीडीएतून गावे वगळल्याची अधिसूचना काढा : आर्थुर डिसोझा 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

‘ग्रेटर पणजी पीडीए’तून सांताक्रुझ आणि सांतआंद्रे परिसर वगळण्याची मागणी नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी मान्य केली असली तरी यासंदर्भात खात्याकडून अधिसूचना जारी केल्याशिवाय 6 एप्रिल रोजीचा नियोजित मोर्चा मागे घेणार नाही, असे सांगून ‘गोयकार अगेंस्ट पीडीए’चे निमंत्रक आर्थुर डिसोझा यांनी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले. 

अध्यक्ष सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली मुख्य नगर नियोजन विकासक राजेश देसाई, सदस्य सचिव पंडिता तसेच आमदार फिलीप नेरी रॉड्रग्रीस या चार जणांच्या उपसमितीच्या पहिल्या बैठकीतलोकांकडून होत असलेल्या सर्व मागण्यांबाबत विचार करण्यात आला होता. त्यानंतर ‘ग्रेटर पणजी पीडीए’तून सांताक्रुझ आणि सांतआंद्रे मतदारसंघातील शिरदोण, आजोशी-मंडूर आणि भाटी या तीन पंचायत क्षेत्रांना वगळण्यास चार सदस्यीय उपसमितीने मान्यता दिली असल्याची माहिती नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी 21 मार्च रोजी दिली. मंत्र्यांच्या या घोषणेनंतरही सदर पीडीएविरूद्ध आंदोलन करत असलेल्या समितीचे निमंत्रक आर्थुर डिसोझा यांनी असमाधान व्यक्त केले आहे.

डिसोझा म्हणाले की, चार सदस्यीय समितीच्या बैठकीत तीन पंचायतींना वगळण्याबाबतच्या निर्णयाला अजूनही अधिकृत मान्यता मिळालेली नाही. समितीचा हा निर्णय आता नगर नियोजन मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. अन्य सर्व पंचायतींच्या सरपंचांकडून आणि ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरावावर  येत्या 9 एप्रिल रोजी होणार्‍या बैठकीत चर्चा  होऊन त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. आंदोलकांनी याच विषयावर याआधीच सरकारला इशारा देऊन 6 एप्रिल रोजी पणजीत  मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. तरीही खात्याने या मोर्चाची दखल न घेता मंडळाची बैठक 9 रोजी ठेवल्याने ही कृती संशयास्पद वाटत आहे. याआधी खात्याने आपलेच जाहीर केलेले अनेक निर्णय मागे घेतले असल्याने जोपर्यंत सदर पीडीएतून अधिकृतरित्या गावे वगळली जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे. 

कालापुरात आज बैठक

‘ग्रेटर पणजी पीडीए’तून सांताक्रुझ आणि सांतआंद्रे परिसर वगळण्याच्या मागणीबाबत स्थानिक गावकर्‍यांची आणि पंचायत सदस्यांची सोमवारी 2 एप्रिल रोजी संध्याकाळी कालापूर येथे बैठक होणार आहे. या बैठकीत येत्या 6 रोजी नियोजित मोर्चाबाबतच्या अंतिम  निर्णयावर चर्चा होणार असून यासंबंधी मंगळवारी सदर निर्णय जाहीर केला जाणार आहे, असे निमंत्रक आर्थुर डिसोझा यांनी सांगितले. 

 

Tags : goa, goa news, Panaji, PDA, excluding village,


  •