Wed, Jul 24, 2019 05:47होमपेज › Goa › मासळी व्यापारी संघटनेतून इब्राहिम यांना हटवा

मासळी व्यापारी संघटनेतून इब्राहिम यांना हटवा

Published On: Jul 17 2018 1:33AM | Last Updated: Jul 16 2018 11:21PMमडगाव : प्रतिनिधी

घाऊक मासळी व्यापारी संघटनेतून विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मौलाना यांची हकालपट्टी करून या संघटनेत गोमंतकीयांना स्थान द्यावे, अशी मागणी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. माडेलच्या घाऊक मासळी बाजारात बाहेरून मासळी घेऊन  येणार्‍या प्रत्येक वाहनाची अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.आलेमाव म्हणाले, भाजी, चिकन, मटण या सर्वांमध्ये घातक रसायनांचा वापर होत असून आता गोमंतकीयांनी खायचे काय, असा प्रश्‍न पडला आहे. पूर्वी मृतदेह ठेवण्यासाठी आतासारख्या शववाहिका नसायच्या.त्यामुळे लोक मृतदेहांना फार्मोलिन लावून मृतदेह दोन-तीन दिवस जतन करून ठेवायचे. तेच फार्मोलिन आता मासळीसाठी वापरले जात असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

घाऊक मासळी संघटनेचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम याला संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी करून आलेमाव म्हणाले, इब्राहिम यांची मार्केटमध्ये एकाधिकारशाही सुरू आहे. हे संपूर्ण मार्केट त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे गोमंतकीयांना तिथे व्यवसाय करता येत नाही. घाऊक मासळी व्यापारी संघटनेवर सर्व  सदस्य बिगरगोमंतकीय आहेत. या संघटनेवर गोमंतकीयांना स्थान मिळायला हवे.तसेच सरकारने  इब्राहिम यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवावे, अशी मागणीही चर्चिल यांनी केली.

गोमंतकीयांना घाऊक मासळी संघटनेच्या सदस्यपदी स्थान मिळावे यासाठी आपण दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले होते. पण मौलाना इब्राहिम यांनी गोमंतकीयांना समितीत घेतले नाही. घाऊक मासळी बाजार इब्राहिम याच्या हाती दिगंबर कामत यांनी दिला होता, असेही चर्चिल आलेमाव म्हणाले.घाऊक मासळी बाजाराच्या संघटनेवर 95 टक्के गोमंतकीय असावेत तरच गोव्यातील मासळीला घाऊक मासळी बाजारात स्थान मिळेल. गोव्यातील मासळी घाऊक मासळी बाजारात आल्यास गोमंतकीयांवर बाहेरची फार्मोलीनयुक्त मासळी खायची वेळ येणार नाही, असे चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.यावेळी कोलवाचे पंचायत सदस्य मिनींनो फेर्नांडिस व इतर उपस्थित होते.

आपल्याविरूध्द इब्राहिमचा वापर : चर्चिल

मौलाना इब्राहिम हे पूर्वी दिगंबर कामत यांच्यासोबत होते, आता ते नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याबरोबर आहेत. वारा येईल तसे सूप फिरवण्याची इब्राहिम यांची पद्धत आहे. विधानसभा निवडणुकीत नावेलीतून  अपल्याला पाडण्यासाठी आमदार कामत यांनी इब्राहिम यांचा वापर केला होता, असा गौप्यस्फोट चर्चिल आलेमाव यांनी केला आहे.