Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Goa › वाया जाणार्‍या पाण्यावर मडगाव पालिकेकडून उपाय

वाया जाणार्‍या पाण्यावर मडगाव पालिकेकडून उपाय

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 03 2018 11:38PMमडगाव : प्रतिनिधी 

मडगाव नगरपालिकेकडून दै ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल घेऊन कोमुनिदाद इमारतीजवळ नळ जोडणीतून वाहणार्‍या पाण्यावर उपाय करण्यात आला असून नळाची दुरूस्ती करण्यात आली आहे. चार महिने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेने चार दिवसांच्या आत दुरूस्ती केली तर दहा दिवसांच्या आत नळ जोडणीचा गैरवापर होऊ नये म्हणून गेट लावून कुलूप ठोकले आहे. 

मडगाव शहरातील मध्यभागी  असलेल्या कोमुनिदाद इमारतीजवळ पालिकेच्या नळ जोडणीतून गेल्या चार महिन्यांपासून पाणी वाया जात होते. रोज शेकडो दुचाकी वाहने या वाहत्या नळाकडे वाहने पार्क करून जात होते. नगरपालिकेच्या पाणी जोडणीचा नळ सतत उघड्यावर पडलेला होता तर अनेकजण त्याचा वापर करत होते. मडगाव नगरपालिकेच्या नळ जोडणीतून गेल्या चार महिन्यांपासून पाणी वाहून पाण्याची नासाडी होत होती. यामुळे नागरिकांत संताप वाढत होता. संबंधित वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खात्याचेे कनिष्ठ अभियंता भट यांनी दखल घेत नळ दुरुस्ती केली. 

उपनगराध्यक्ष टिटो कार्दोज यांनी सांगितले, की पालिका अभियंत्यांना या नळाची दुरुस्ती करून घेण्याचे आदेश दिले असता चार दिवसांच्या आत नळाची दुरुस्ती करून घेण्यात आली. मडगाव कोमुनिदाद इमारतीच्या खाली असणारा पालिकेचा नळ झाडांना पाणी घालण्यास वापरण्यात येत होता.  नळातून  विनाकारण पाणी वाहणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ, असे  पालिका अभियंते मनोज आर्सेकर यांनी सांगितले. 

दै.‘पुढारी’त वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेने दखल घेऊन चार दिवसांत दुरुस्ती केली. पूर्वी कोणीही  नळाचा वापर हवा तसा करत होते. मात्र, गेले तीन दिवस या नळाचा वापर केवळ नगरपालिकेचे कामगार झाडांना पाणी घालण्यासाठी करतात. काम झाल्यावर कामगार गेट बंद करून त्याला कुलूप घालून जातात.

शहरातील कोमुनिदादजवळ वाहणार्‍या पाण्याचा महत्वाचा मुद्दा ‘पुढरी’त प्रसिद्ध झाल्याने कारवाई करता आली. कुठेही पाण्याविषयी समस्या निर्माण झाल्यास नागरिकांनी त्वरित सार्वजनिक बांधकाम खात्याशी संपर्क साधावा. यापुढे असा प्रकार घडणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता भट यांनी सांगितले.

Tags : Goa, Remedies, Margao, Municipality, waste, water