Tue, Jul 16, 2019 23:54होमपेज › Goa › खाण घोटाळ्यातील 300 कोटींची वसुली 

खाण घोटाळ्यातील 300 कोटींची वसुली 

Published On: Jul 26 2018 7:56AM | Last Updated: Jul 27 2018 1:24AMपणजी : प्रतिनिधी

खाण घोटाळयातील महसुली गळतीची  वसुली  करण्यास सरकारने सुरुवात केली असून आतापर्यंत  300 कोटी रुपयांची वसुली झाल्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासात   आमदार लुईझिन फालेरो यांच्या प्रश्‍नावर उत्तर देताना सांगितले. येत्या दोन ते तीन महिन्यांत पुढील वसुली प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले,  खाण  घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या शहा आयोगाने आपल्या अहवालात खाण लिज धारकांनी 578 हेक्टर जमिनीवर अतिक्रमण केल्याचे नमूद केले  होते. मात्र, त्यानंतर राज्य सरकारच्या खाण खात्याने केलेल्या सर्व्हेक्षणात अतिक्रमण हे  578 हेक्टर  इतके नसून केवळ 10 हेक्टर जमिनीवर झाल्याचे समोर आले.

यावरून   शहा आयोगातील सदर नोंद ही चुकीची असल्याचे दिसून आले. खाण घोटाळ्यात झालेल्या लुटीची रक्‍कम वसूल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि राज्य सरकारनेही आपल्या प्रतिज्ञापत्रात वसुलीची कारवाई सुरू करण्यात आल्याचे म्हटले होते.  त्यानुसार सरकारने ही  लूट वसूल करण्यास सुरुवात केली असून आता पर्यंत  300 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील लुटीच्या रकमेचा अभ्यास करण्यासाठी सरकारने  22 चाटर्ड अकाऊटंट नेमले होते.  त्यानुसार  खाण घोटाळ्यात गुंतलेल्या खाण व्यावसायिकांना नोटिसा  बजावण्यात आल्या असून त्यांच्या उत्तराची तपासणी केली जाईल. त्यानंतर  वसुली प्रक्रिया सुरू  करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

खाण घोटाळा; चार हजार कोटींचे नुकसान 

खाण घोटाळ्यामुळे झालेल्या  नुकसानीचा आकडा  चार्टर्ड अकाऊटंटनी दिलेल्या अहवालाप्रमाणे  दीड हजार कोटी रुपये इतका आहे. याशिवाय   एसआयटीकडून देखील खाण घोटाळ्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा  साडेतीन हजार  ते  चार हजार  कोटी रुपये  इतका असेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  एसआयटीकडून   खाण घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत   आठ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर आणखी  सुमारे पाच ते सहा प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.