Mon, Jun 01, 2020 22:45
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › पणजी : भाजप उमेदवाराला 'गोसुमं'च्या वेलिंगकरांचे आव्हान

पणजी : भाजप उमेदवाराला 'गोसुमं'च्या वेलिंगकरांचे आव्हान

Published On: Apr 26 2019 2:57PM | Last Updated: Apr 27 2019 1:58AM
पणजी : प्रतिनिधी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाविरुद्ध गोवा सुरक्षा मंचतर्फे (गोसुम) पोटनिवडणूक लढविणार असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अरविंद भाटीकर यांनी आज, शुक्रवारी जाहीर केले.

यावेळी प्रा. वेलिंगकर म्हणाले, पणजी ही आपली जन्मभूमी -कर्मभूमी असून राजधानी शहराचा स्थित्यंतराचा आपण साक्षीदार राहिलो आहे. पणजीला स्मार्ट सिटी बनविण्याचे भाजपचे स्वप्न गेली अनेक वर्षे अपुरेच राहिले आहे. पणजीवासियांना मुलभूत साधन सुविधा व सोयी पुरवण्यात भाजपला अपयश आले असल्याचे ते म्हणाले. 

पणजीत पार्किंग, कचरा ,कॅसिनो, सान्त इनेज खाडीची स्वच्छता, मलनिस्सारण व्यवस्था, पाणीपुरवठा आदी ज्वलंत समस्या असून मागील पंचवीस वर्षे भाजपच्या आमदाराला या समस्या सोडवण्यास अपयश आलेले आहे. स्थानिक म्हणून या समस्या सोडविण्यास आपण प्राधान्य देणार आहे. आपल्याला भाजप गटातील नव्हे तर कॅथलिक, मुस्लिम बांधवांचाही पाठिंबा मिळाला आहे. आपल्या रुपाने गोसुमंचा गोवा विधानसभेत प्रवेश होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.