Wed, Apr 24, 2019 07:32होमपेज › Goa ›  राज्यात योग, आयुर्वेदाची महाविद्यालये उभारणार 

 राज्यात योग, आयुर्वेदाची महाविद्यालये उभारणार 

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 1:08AMडिचोली : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या आयुष खात्यातर्फे  उत्तर गोव्यात सुमारे 1 हजार कोटी खर्च करुन योगा व आयुर्वेदाची दोन वैद्यकीय महाविद्यालये उभारणार असून एक साखळीच्या ठिकाणी असणार आहे. या दोन्हीही वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा 1 हजार नोकर्‍या उपलब्ध होणार असून यामध्ये स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी साखळी येथे दिली.

साखळी मतदारसंघात उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी जनसंपर्क दौर्‍याचे आयोजन केले होते, त्याची सांगता साखळी येथे दादा बोरकर सभागृहात झाली. यावेळी मंत्री नाईक बोलत होते.

व्यासपीठावर साखळीचे आमदार तभा सभापती डॉ. प्रमोद सावंत, साखळीचे नगरसेवक उपेंद्र कर्पे, भाजप साखळी मंडळ अध्यक्ष प्रदीप गावडे, सचिव सुभाष फोंडेकर, विठोबा घाडी, आनंद काणेकर आदी उपस्थित होते.

नाईक म्हणाले, की खासदार निधीतून उत्तर गोव्यात व साखळी मतदारसंघात विविध विकासकामांना चालना दिली आहे. मोदी सरकारने देशात अनेक लोकहितकार्य योजना राबविल्या असून जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही केंद्रात भाजपचेच सरकार येईल. आपल्याला गेली 20 वर्षे खासदार म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल आपण आभार मानून असेच सहकार्य व पाठिंबा यापुढेही द्याल, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली. 

सभापती डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की साखळी मतदारसंघाचा चौफेर विकास भाजप सरकारने केला आहे. साखळी पालिकेच्या आडमुठी धोरणामुळे साखळी पालिकाक्षेत्र मास्टर प्लानच्या  योजनांपासून वंचित राहिले आहे. विद्यमान पालिका मंडळाने साखळीचा काहीच विकास केलेला नाही केवळ स्वतःच्या फायद्याचे राजकारणच केले. 

नगरसेवक उपेंद्र कर्पे म्हणाले, की काही विकासाचे पूर्वीचे प्रस्ताव आज पूर्ण झाले आहेत. आमदार डॉ.प्रमोद सावंत यांच्या सहकार्यानेच सर्व विकासाच्या योजना मार्गी लागल्या आहेत.

संदीप परब यांनी खाणबंदीची समस्या मंत्री नाईक यांच्यासमोर मांडली. खाण बंदीमुळे खाण अवलंबित धास्तावले असून त्यांना आधार देणे गरजेचे आहे. पणजी येथे जो प्रकार घडला त्यांना माफी असावी. मात्र, खाण अवलंबितांच्या मागे जो पोलिसांचा ससेमीरा सुरु आहे तो थांबवावा, अशी मागणी यावेळी संदीप परब व सुरेश देसाई यांनी केली. दत्ताराम चिमूलकर, विनय पांगम, पांडुरंग कुट्टीकर यांनीही विविध समस्या मांडल्या.

मंत्री श्रीपाद नाईक यांनी आमोणा येथून या जनसंपर्क दौर्‍याला प्रारंभ केला. नंतर विर्डी, न्हावेली- मायणी, वेळगे, कुडणे लोकांची भेट घेतली. साखळी रवींद्र भावनात मतदार संघातील सरपंच व पंचायत सदस्यांची बैठक घेतली. या दौर्‍यात मंत्री नाईक यांनी जनतेशी संवाद साधत विकासकामांचा आढावा घेतला.सूत्रसंचालन सिध्दी पोरोब यांनी केले. आनंद काणेकर यांनी आभार मानले.