Tue, Sep 25, 2018 09:40होमपेज › Goa › अतिवृष्टी नाही, मात्र मुसळधार!   

अतिवृष्टी नाही, मात्र मुसळधार!   

Published On: Jul 06 2018 1:31AM | Last Updated: Jul 05 2018 11:49PMपणजी : प्रतिनिधी

गोवा वेधशाळेकडून  शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्‍त करून  बुधवारी  रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, बदललेल्या वातावरणामुळे अतिवृष्टी होणार नसल्याचे वेधशाळेने कळवले आहे. मात्र, राज्यातील काही भागात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. वेधशाळेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत राज्यात 45 इंच पावसाची नोंद झाली आहे. समुद्री भागात वार्‍याची गती तसेच लाटांची उंचीही वाढण्याची शक्यता कायम असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. 

गेल्या 24 तासांत कमाल तापमानात एका अंशाने वाढ झाली असून सध्या राज्यातील कमाल तापमान 30.8 अंश सेल्सिअस तर किमान 24.6 अंश सेल्सिअस इतके आहे. पुढील 24 तासांत कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला  आहे. वेधशाळेच्या आकडेवारीनुसार  गेल्या 24  तासांत  फोंडा व साखळी येथे सर्वाधिक प्रत्येकी दोन इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पणजीत एका इंचाहून अधिक पाऊस पडला तर सर्वात कमी पावसाची नोंद मुरगाव येथे झाली आहे. राज्यात 1 जून ते आतापर्यंत पेडण्यात सर्वाधिक पाऊस पडला असून पावसाने या भागात इंचाचे अर्धशतक ओलांडले आहे. पेडण्यात आतापर्यंत 53 इंच पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद केपे येथे 37 इंच इतकी आहे.