Thu, Apr 25, 2019 14:01होमपेज › Goa › नववर्ष स्वागतासाठी राहुल गांधीही गोव्यात

नववर्ष स्वागतासाठी राहुल गांधीही गोव्यात

Published On: Jan 01 2018 1:54AM | Last Updated: Dec 31 2017 11:31PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात दाखल झाले आहेत.   सोनिया गांधी थांबलेल्या दक्षिण गोव्यातील ‘लीला बीच’ या पंचतारांकित हॉटेलमध्येच तेही उतरले आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर देशभर दौरे केल्यानंतर आणि गुजरातमधील निवडणुकीत जोरदार कामगिरी केल्यानंतर राहुल गांधी यांनी विश्रांतीसाठी गोव्याला पसंती दिली आहे. 

गांधी परिवाराचे गोवा हे सुट्टी एन्जॉय करण्यासाठीचे आवडते ठिकाण, असे मानले जाते. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धुरा राहुल गांधी यांच्या हाती सुपुर्द केल्यानंतर  सोनिया गांधी गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आल्या आहेत. गेल्या आठवड्यात 26 डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून गोव्यात दाखल झाल्या आहेत. दक्षिण गोव्यातील लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये मोजक्या मित्रमंडळींसह त्या आल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत केल्यानंतर राहुल गांधी सोमवारी दिल्लीला परतणार आहेत तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोनिया गांधी गोव्याचा निरोप घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्री, उद्योगपती, कलावंत गोव्यात

नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात केंद्रीय मंत्री, उद्योगपती, न्यायाधीश, बॉलीवूड कलाकार दाखल झालेले आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजित सिंह राज्यात आले आहेत. नववर्ष स्वागताबरोबरच लग्नाचा वाढदिवसही साजरा करण्यासाठी मि. परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान व पत्नी किरण राव गोव्यात  आले आहेत.