Thu, Apr 25, 2019 21:28होमपेज › Goa › ...तर ‘मगो’ला सरकारमधून बाहेर काढण्यासाठी दबाव आणा

...तर ‘मगो’ला सरकारमधून बाहेर काढण्यासाठी दबाव आणा

Published On: Jan 19 2018 1:50AM | Last Updated: Jan 18 2018 11:13PMमडगाव : प्रतिनिधी

गोवा महाराष्ट्रात विलिनीकरण करण्याचा मगो पक्षाचा प्रयत्न  होता, ते आजही डॉ.जॅक सिक्वेरांच्या स्मारकाला विरोध करीत आहेत.विजय सरदेसाई यांना खरोखरच जॅक सिक्वेरा यांच्याबद्दल आदर आणि प्रेमाची भावना असेल तर त्यांनी मगो पक्षासमवेत सरकार चालवण्यापेक्षा मगो ला बाहेर काढण्यासाठी सरकारवर दबाव आणावा,असे आवाहन  माजी मंत्री मिकी पाशेको यांनी गुरूवारी केले.

मगो पक्षाने विलीनीकरणासाठी प्रयत्न केले होते.विजय सरदेसाई यांचा जन्म परदेशात झाल्याने त्यांना बहुतेक हे माहीत नसावे.सरदेसाई यांनी अशा पक्षासमवेत   सरकारात राहण्यापेक्षा त्यांना सरकारमधून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे मागणी करावी,असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री पर्रीकर यांचा डावा हात मगो ओढत आहे,तर  उजवा हात गोवा फॉरवर्ड ओढत आहे .ही स्थिती पाहता लवकरच निवडणुका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही,  असेही मिकी म्हणाले

दोन दिवस जनमत कौल दिन साजरा करण्यात आला.आपण गेली पंधरा वर्षे राजकारणात आहोत, आमदारकी आणि त्या नंतर मंत्रिपद सुद्धा भूषवले पण एवढ्या वर्षात जनमत कौलाच्या विषयावरून कधीच राजकारण केले नाही.या वेळी मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाल्याचे मिकी पाशेको म्हणाले. हे सरकार भाजप ,मगो ,गोवा फॉरवर्ड, अपक्ष आमदाराना  घेऊन बनलेले आहे पण हुकूमत मात्र नगरविकास मंत्र्यांची चालत आहे.पूर्वी आपली जमीन विकायला कोणाची परवानगी लागत नव्हती आता नव्या कायद्यानुसार नगरविकास खात्याची परवानगी लागते. पूर्वी एकाच बाजूने लूटमार होत होती आता दोन्ही बाजूंनी जमीन खरेदी करणार्‍या आणि विकणार्‍यांना लुटण्याचा हा डाव असल्याचे पाशेको म्हणाले.

विजय सरदेसाई हे गेल्या सहा वर्षांपासून आमदार आहेत.जनमत कौलाचे नाव कोलवा सर्कलला देऊन त्यांनी एका प्रकारे अनादर केला आहे .त्याऐवजी त्यांनी जॅक सिक्वेरांचा पुतळा त्या सर्कल मध्ये उभारण्याची आवश्यकता होती.सरदेसाई यांच्या घरासमोर जिल्हा इस्पितळ साकारत आहे त्या इस्पितळाला जॅक सिक्वेरांचे नाव देण्याची आवश्यकता होती.लोकांना हा पक्ष काय तो कळाला आहे .लोकांना भुलवण्याची ही नाटके सुरू असल्याचेही मिकी म्हणाले.

काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्याला विजय सरदेसाईंचा सध्या पुळका आलेला आहे.काँग्रेस नेते सरकार पडण्याची  केवळ स्वप्ने पहात आहेत,सरकार घडविण्याची आणि चालवू शकतील अशी परिस्थिती काँग्रेस पक्षात नाही. वडील काँगेसमध्ये आहेत तर पुत्र भाजपात गेलाय,अशी स्थिती काँग्रेसची असून या प्रकरणात वडिलांना निलंबित करण्याची गरज होती.राज्यसभा निवडणुकीत पाच आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले त्याची चौकशी सुद्धा झाली नाही,पत्नी काँग्रेसमध्ये आहे तर पती दुसरीकडे गेलाय,जो पर्यंत अशा लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यत काँग्रेस सुधारली आहे,असा संदेश लोकांमध्ये पोचणार नाही,असे मिकी म्हणाले.

भाजप सरकारला विरोधी कोणीच नाही .विरोधी पक्ष नेता सुद्धा सरकारचा भागीदार आहे.गोवा फॉरवर्ड पाच वर्षापूर्वी कोणते विषय घेऊन लोकांसमोर आले होते. ते प्रश्‍न सुटले आहेत का, यावर विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

...तर दामूंना फातोर्ड्यात पाठिंबा : मिकी

राजकारणात काहीच स्थिर नाही फातोर्ड्यात माजी आमदार दामू नाईक यांनी पक्षत्याग करून दुसर्‍या पक्षात प्रवेश केल्यास त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिला जाईल, असे मिकी म्हणाले.