Thu, Jul 18, 2019 08:03होमपेज › Goa › ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणार

ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणार

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 25 2018 12:31AMमडगाव ः प्रतिनिधी

ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार व रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी केले. राज्य अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळाच्या दक्षिण गोवा कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंत्री गावडे पुढे म्हणाले की, व्यावसायिक शिक्षणासाठी एक लाख रुपयांपर्यंत लघू मुदतीचे झटपट कर्ज आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांनी व विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी दक्षिण गोव्यातील या कार्यालयात येऊन माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारची प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत पोहोेचत नाही तोपर्यंत सरकार विकास करण्यात यशस्वी झाले, असे म्हणू शकत नाही. उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यात अनुसूचित व आदिवासी  समाजाचे बांधव जास्त प्रमाणात आहेत. कोणतीही गोष्ट शक्य करण्यास व यशस्वी करण्यात त्यात अनेक हातांचे परिश्रम लागते. यावेळी सर्वांचे सहकार्य अनमोल असून हे कार्यालय उभारण्यास प्रत्येकाचा महत्वाचा  वाटा आहे, असे मंत्री गावडे म्हणाले.

दक्षिण गोव्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. शिक्षण ही बाब खूप खर्चिक असल्याने पूर्वी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता येत नव्हते. परंतु, यापुढे पैसे नसल्याने आदिवासी समाजातील विद्यार्थ्याला शिक्षण घेता आले नाही, असे होणार नाही.  आदिवासी समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी हे महामंडळ कार्यरत राहणार आहे. या कार्यालयाचा कारभार पाहण्यासाठी पूर्णवेळ अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

व्यवस्थापकीय संचालक संध्या कामत म्हणाल्या की, आदिवासी कल्याण खाते समाज बांधवांच्या गरजेनुसार तीन प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देईल. खात्यांतर्गत आतापर्यंत 13 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. चार हजार आदिवासी बांधवांनी याचा लाभ घेतला आहे. यापुढेही आदिवासी बांधवांनी खात्यांतर्गत येणार्‍या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आदिवासी कल्याण खात्याचे संचालक वेनान्सियो फुर्तादो म्हणाले की, मंत्री गोविंद गावडे यांच्या प्रयत्नांमुळे एक वर्षाच्या आत दक्षिण गोव्यात आदिवासी कल्याण खात्याचे कार्यालय उभारण्यात आले. दीड लाख आदिवासी बांधव सासष्टी तालुक्यात राहत असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे महामंडळ कार्यरत राहणार आहे. महामंडळाचे अधिकारी दुर्गादास कामत म्हणाले की, एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात येणार्‍या आदिवासी बांधवाला एका महिन्याच्या आत प्रतिसाद दिला जाईल. समाजाच्या कल्याणासाठी  यापुढेही नवीन योजना आखल्या जाणार आहेत. अनुसूचित जमातीच्या मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप म्हणाले की, 25 मे या प्रेरणादिनाच्या एक दिवस अगोदर दक्षिण गोव्यात आदिवासी कल्याण खात्याच्या कार्यालयाचे उद्घाटन होत असल्याने आनंद होत आहे. या समाजाला आदर्श व सक्षम बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. खात्यात अनुभवी अधिकारी असल्यास समाजातील बांधवांना कोणत्याच अडचणी येणार नाहीत.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर चौगुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. संध्या कामत यांनी प्रास्ताविक केले. मडगावच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे राज्य अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळाचे दक्षिण गोवा कार्यालय उघडण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या कामत, महामंडळचे अधिकारी  दुर्गादास गावडे, अनुसूचित समाजाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक वेनान्सियो फुर्तादो उपस्थित होते.