Mon, May 20, 2019 10:04होमपेज › Goa › मडकईकरांच्या बांधकामाला परवानगीबाबत माहिती द्या

मडकईकरांच्या बांधकामाला परवानगीबाबत माहिती द्या

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 02 2018 12:57AMपणजी : प्रतिनिधी

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या जुने गोवे येथील बंगल्याच्या कथित अनधिकृत संरक्षक भिंत व  उद्यान बांधकामाला परवानगीबाबत माहिती द्यावी, अशा आशयाचे पत्र दिल्लीस्थित भारतीय पुरातत्त्व विभाग (आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया)च्या अतिरिक्त संचालकांना भारतीय पुरातत्त्व विभागाच्या गोवा शाखेने  पाठवले आहे.

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या गोवा शाखेच्या अधीक्षकांनी दिल्लीस्थित केंद्रीय कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात मडकईकर हे सरकारातील मंत्री असल्याने जनतेकडून अनधिकृत बांधकामांबाबत चौकशी होत असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाकडून लोकांच्या तक्रारी स्थानिक पुरातत्त्व विभागाकडे पाठपुराव्यासाठी  सोपवण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे. 

जुने गोवे येथील सर्व्हे क्रमांक :  144/2 या जागेत मडकईकर यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासंदर्भात भारतीय पुरातत्त्व विभागाने मडकईकर यांना 5 नोव्हेंबर 2015 रोजी नोटीस बजावली होती.  त्यानंतर या नोटिसीला मडकईकर यांनी 12 नोव्हेंबर 2015 रोजी उत्तर दिले होते. यात संरक्षण भिंतीच्या कामासाठी     दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडून आवश्यक ती परवानगी घेतली जाईल, असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडून बंगल्याची संरक्षक भिंत उभारण्यासाठी घेतलेल्या परवानगीची प्रत सादर करावी, असे निर्देश भारतीय पुरातत्व विभागाने   मडकईकर यांना कळवले आहे. 

मडकईकरांच्या बंगल्याच्या बांधकामाला राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने मान्यता दिली असली तरी बंगल्याच्या कथित अनधिकृत  संरक्षक भिंतीसंबंधी नोटीस पाठवण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे.  सदर नोटीस मिळूनही मडकईकरांच्या  ‘निकीताशा रियाल्टर लि.’ने  सदर संरक्षक भिंतीचे बांधकाम थांबवले नव्हते. वीज मंत्री मडकईकर यांचा जुने गोवे येथील कथित 200 कोटी रुपयांच्या अनधिकृत बंगल्याची संरक्षक भिंत ही बॅसिलिका ऑफ बॉम जिजस चर्चच्या परिसरापासून 50 मीटर्स अंतरात येत असल्याने त्यावर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी केली आहे.