Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Goa › सत्तरीतील धबधब्यांच्या ठिकाणी सुविधा पुरवा

सत्तरीतील धबधब्यांच्या ठिकाणी सुविधा पुरवा

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 08 2018 1:43AMवाळपई : प्रतिनिधी

पावसाळी मोसमात सत्तरी तालुक्यात चरावणे, पाली, सालेली नानेली, खोतोडा अशा विविध ठिकाणी कोसळणार्‍या धबधब्यांच्या परिसरांत  पर्यटकांसाठी कोणत्याही   सुविधा उपलब्ध न केल्याने पर्यटकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  गेल्या आठवडाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे डोंगर कपारीमधून  धबधबे प्रवाहित होत असून  तेथे निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. मात्र आवश्यक  सुविधा पुरवणे गरजेचे असतानाही  पर्यटन खाते मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र  दिसत आहे. याचा प्रतिकूल परिणाम पर्यटकांच्या संख्येवर होत असून सरकारने पावसाळी पर्यटन वृध्दीच्यादृष्टीने   सत्तरी तालुक्याला प्राधान्य देण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.

सत्तरी तालुक्यातील जलप्रपात  निसर्गप्रेमींसाठी  आकर्षणाचे  केंद्र  ठरत असून गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळताना दिसत आहे.  गेल्या काही वर्षांपासून धबधब्यांच्या ठिकाणी चेंजिंग रूम, स्वच्छतागृह आदी सुविधा पुरवाव्यात, अशा प्रकारची मागणी सातत्याने निसर्गप्रेमी व स्थानिक नागरिक करत असतानाही याकडे सरकारने गाभिंर्याने लक्ष दिलेले नाही. धबधब्याच्या परिसरांमध्ये  सुविधा उपलब्ध नसल्याने या परिसरात मौजमजेसाठी येणारे पर्यटक  उघड्यावरच नैसर्गिक विधी उरकत असल्याने तेथे  घाणीचे साम्राज्य पसरत आहे. सत्तरी तालुक्यातील अनेक धबधबे प्रमुख रस्त्यावरून बर्‍याच प्रमाणात रानामध्ये असल्याने सदर ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर वाट नसल्याने याचा बराच मनस्ताप निसर्गप्रेमींना सहन करावा लागत आहे .सत्तरी तालुका हा पावसाळी मोसमासाठी चांगल्या प्रकारचे डेस्टिनेशन होण्याची शक्यता असून यासाठी सरकारने सकारात्मक धोरण राबविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

चरावणे   गावातील धबधबा  लोकप्रिय असून तेथे जाण्यासाठी सरकारने  वाट करावी, अशी मागणी ठाणे डोंगरी पंचायत मंडळ व गावकर्‍यांनी अनेकदा  करूनही त्याकडे  दुर्लक्ष झाले आहे,अशी  माहिती  सामाजिक कार्यकर्ते चंद्र गावस यांनी दिली. पावसाळ्यात धबधब्यांचे आकर्षण सर्वांनाच असते.  यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी या धबधब्यांचा आधार सरकारने घ्यावा, असे यावेळी  गावस यांनी स्पष्ट केले.भागाच्या पंचायत सदस्य प्रशिला  गावस यांनी  सांगितले,की    धबधब्याच्या ठिकाणी   हजारो निसर्गप्रेमी देशी व विदेशी पर्यटक भेट देऊन मौज मजा लुटताना दिसतात.

त्यामुळे  चार महिने गावाला  जत्रेचे स्वरूप येत असल्याने सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास गावाच्या  विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरेल.  याठिकाणी कोसळत असलेल्या धबधब्यांच्या   ठिकाणी शनिवारी व रविवारी मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी भेट देतात. गोपाळ गावकर यानी सांगितले,की  धबधब्याच्या रुपाने या गावाला नवी ओळख लाभली असून   सरकारने भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास  करणे  गरजेचे आहे.

ठाणे डोंगर्ली पंचायतीच्या सरपंच सरिता गावकर यांनी सांगितले, की पंचायतीतर्फे ठाणे गावच्या पर्यटनदृष्ट्या विकासाबाबत खात्याला  प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. धबधब्यांच्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारला विनंती करण्यात येणार  आहेे. याबाबतचा मुद्दा अनेकदा   ग्रामसभेच्या माध्यमातून हा विषय गाजला असून  वारंवार प्रयत्न करूनही सरकारने याची गंभीर दखल  घेतली नाही.