Tue, Jun 18, 2019 21:21होमपेज › Goa › गोवा राज्य सहकारी बँक तोट्यातून नफ्यात

गोवा राज्य सहकारी बँक तोट्यातून नफ्यात

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 02 2018 12:54AMपणजी : प्रतिनिधी

प्रशासक नेमल्यानंतर सहा महिन्यांत गोवा राज्य सहकारी बँकेचा कारभार सुधारला आहे. दरवर्षी होणार्‍या तोट्यातून बाहेर पडून बँकेला 2017-18 या आर्थिक वर्षात बँकेला 11 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. ‘एनपीए’चे प्रमाण13 वरून 7 टक्क्यांवर आले आहे.  खर्चावर आणलेल्या बंदीमुळेे आणि ‘व्हीआरएस’ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे बँकेची आर्थिक बाजू सावरली गेल्याचे  प्रशासक व्ही. बी. प्रभू वेर्लेकर यांनी सांगितले. 

गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपल्याने तसेच बँकेची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने सरकारने गतसाली 25 सप्टेंबर 2017 रोजी बँकेवर त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीची नेमणूक केली होती. या समितीचे अध्यक्ष चार्टर्ड अकाऊंटंट व्ही. बी. प्रभू वेर्लेकर असून चार्टर्ड अकाऊटंट शैलेश उसगावकर तसेच अर्थतज्ज्ञ मोहनदास रामदास अन्य दोन सदस्य आहेत.  बँकेच्या 2016-17 सालच्या वार्षिक अहवालानुसार बँकेला सुमारे 15 कोटी रुपये तोटा झाल्याचे दाखविण्यात आले होते. प्रशासक नेमल्यानंतर मार्च 2018 पर्यंतच्या सहा महिन्यांच्या कारभारात काय फरक पडला याबाबत प्रशासक वेर्लेकर यांनी माहिती दिली.

वेर्लेकर म्हणाले की, बँकेच्या अनाठायी खर्चावर प्रशासक समितीने आळा घातला आहे. हजारो कॅलेंडर, डायर्‍या, मोफत गिफ्ट वस्तू आदीवर बंदी घालण्यात आली आहे. नाहक खर्च पूर्णपणे थांबवण्यात आला असून कर्ज वितरणाची व्यवस्था सुधारली. संचालक मंडळाच्या सदस्यांना बँकेच्या गाड्या वापरण्यास मनाई करण्यात आली. खासगी व्यक्तींपेक्षा सरकारी अनुदानित संस्था, महामंडळे तसेच सरकारी कर्मचार्‍यांना 48 तासांत कर्ज देण्यास प्राधान्य दिले. यामुळे बँकेकडून कर्ज वितरणात 20 टक्क्यांची वाढ झाली. यामुळे बँकेला 31 मार्च 2018 रोजी संपणार्‍या आर्थिक वर्षात प्रथमच सुमारे 20 कोटींचा नफा झाला आहे. 

बँकेच्या ‘एनपीए’चे प्रमाण 13 टक्क्यांवरून 7.4 टक्क्यांवर आले असून भविष्यात हा ‘एनपीए’ 5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा मानस आहे. पुढच्या आर्थिक वर्षात बँकेचा नफा 30 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा प्रशासकांचा प्रयत्न राहणार आहे. या पुढे बँकेला ‘आयएसओ’ प्रमाणपत्र मिळावे, यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे वेर्लेकर यांनी सांगितले.