Sun, Aug 18, 2019 15:17होमपेज › Goa › ‘ओस्सय’च्या निनादात पणजी दुमदुमली!

‘ओस्सय’च्या निनादात पणजी दुमदुमली!

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 12:38AMपणजी : प्रतिनिधी

घुमचे कटर घुम...घुमचे कटर घुम, व ओस्सय ... ओस्सय...च्या निनादात व ढोल-ताशांच्या गजरात अवघी पणजी शनिवारी सायंकाळी दुमदुमून गेली. शिमगोत्सवानिमित्त काढण्यात आलेली चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. 

मीरामार येथील विज्ञान केंद्राजवळ उद्योजक श्रीनिवास धेंपो व माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून शिमगोत्सव मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यंदाच्या शिमगोत्सव मिरवणुकीत  एकूण 15 हून अधिक चित्ररथ, लोकनृत्याची 8 पथके, रोमटामेळाचे 7 गट आणि वेशभूषा स्पर्धेत 34  स्पर्धक सहभागी झाले होते.

विज्ञान केंद्राजवळून सायंकाळी 5 वाजता सुरू झालेल्या शिमगोत्सव मिरवणुकीची हार्डली डेव्हिडसन्स शोरुमकडे सांगता झाली. मिरवणूक पाहण्यासाठी स्थानिकांसह देशी-विदेशी पर्यटकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. गणेशवंदनेने रोमटामेळला सुरुवात करण्यात आली. 

पारंपरिक व देवदेवतांची वेशभूषा परिधान केलेले लोककलाकार, हिंदू धर्मपरंपरेचे व संस्कृतीचे दर्शन घडवणारे पौराणिक  देखावे प्रेक्षकांचे आकर्षण बनले होते. 

पारंपरिक वाद्यांच्या तालावर गुढ्या, तोरणे  व चौरंग   घेऊन नाचणारे   रोमटामेळ पथकातील सदस्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीस सुरुवात झाल्यावर शबय... शबय, असे म्हणत ढोल, ताशांचा गजर  सुरू झाला. कलाकारांनी सादर  केलेले पारंपरिक लोकनृत्य गोफ, घाडेमोडणी, गोव्यातील धनगरी नृत्य, शिवअवतार, मारूतीचा अवतार, गोंयचे घुमट व लोककला पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी सुंदर आविष्कार पाहण्यास मिळाला. सुमारे 60 महिलांनी एकत्र भगवे झेंडे व डोक्याला फेटे बांधून लोकगीते म्हणत मिरवणुकीत भाग घेतला होता. लहान मुलेही फेटे परिधान करून  मिरवणुकीत ‘ओस्सय’च्या तालावर नाचत होती.  यात रावण यम बंदी, अमृत मंथन, रावणाच्या दरबारात हनुमान बंदी, राम, सीता व लक्ष्मण असे विविध देखावे साकारण्यात आले होते. मिरवणुकीच्या मार्गावर कडक कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.