होमपेज › Goa › आमदार, मंत्र्यांशी चर्चेनंतर पंतप्रधानांची भेट

आमदार, मंत्र्यांशी चर्चेनंतर पंतप्रधानांची भेट

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 23 2018 12:07AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाणबंदीप्रश्‍नी खाण भागातील पाच आमदारांशी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी चर्चा केली असून  अन्य आमदार- मंत्र्यांनाही वैयक्‍तिकरित्या भेटून  त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यातील खाणी तातडीने सुरू करण्यासंबंधी चर्चा   करणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

राज्यातील खाणबंदीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी  गुरूवारी दुपारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोलावलेली बैठक अचानक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर खाण भागातील पाच आमदारांशी पर्रीकर यांनी या विषयावर चर्चा केली. पर्वरी येथील शुक्रवारी झालेल्या बैठकीस गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत, आमदार  राजेश पाटणेकर, दीपक पाऊसकर,  प्रविण झांट्ये आणि प्रसाद गावकर उपस्थित होते. पर्रीकर यांनी खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न  करणार, असे आश्‍वासन आमदारांना  दिले असल्याचे एका आमदाराने सांगितले.काही आमदार राज्याबाहेर असल्याने या बैठकीस गैरहजर राहिले, त्यांनाही मुख्यमंत्री पुढील काही दिवसांत भेटणार आहेत. राज्यातील खाण मुद्यावर सल्‍लामसलत करण्यासाठी मुख्यमंत्री संबंधितांच्या नियमित बैठका घेणार आहेत. राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, खाण समस्येवर  सार्वमत जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री खाण पट्ट्यातील आमदारांची संयुक्‍त बैठक घेणार असून त्यानंतर हा विषय केंद्र सरकारकडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.