Sun, Jul 21, 2019 12:47होमपेज › Goa › पाल्यांना दारूच्या पहिल्या चवीपासून रोखा

पाल्यांना दारूच्या पहिल्या चवीपासून रोखा

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 03 2018 11:47PMकेरी : वार्ताहर

कुमारवयीन मुलांना नवीन गोष्टी करण्याचे नेहमीच कुतूहल असते. या कुतूहलापोटी आणि मित्रांच्या संगतीचा दबाव यामुळे पहिल्या दारूची चव घेतली जाते. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना दारूच्या पहिल्या चवीपासून रोखले पाहिजे, असे आवाहन समुपदेशक तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी काढले. अमली पदार्थ विरोधी कृती समिती आणि विवेकानंद प्रेरणा प्रतिष्ठान तसेच जागरूक नागरिकांच्या सहकार्याने सोलये सत्तरी येथे आयोजित व्यसनमुक्ती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अमली पदार्थ विरोधी कृती समितीचे निमंत्रक निलेश शेटकर, गौड गोमंतक मराठा समाजाचे उपाध्यक्ष सूर्यकांत गावडे, स्थानिक पंचायत सदस्य प्रतीक्षा गावडे, सरकारी प्राथमिक विद्यालय सोलयेच्या  शिक्षिका दीप्ती  गावस, विवेकानंद प्रेरणा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दशरथ मोरजकर, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टिपराळे, विवेकानंद ज्ञान मंदिर हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक गोपीनाथ गावस, स्थानिक कार्यकर्ते देवानंद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पाटकर पुढे म्हणाले की, दारूची पहिलीच चव घेण्यापासून मुलांना किंवा युवकांना वाचवले तर त्यांना दारूचे व्यसन जडणारच नाही. आणि त्यातून व्यसनमुक्‍त पिढी निर्माण होईल. दारू आमच्या संस्कृतीला वर्ज आहे. आम्ही आमच्या धार्मिक उत्सवावेळी अथवा नैवेद्य म्हणून देवाला दारू दाखवत नाही. त्यामुळे आम्हाला ती कशी चालणार असा टोला मारताना आपल्या मुलांना दारूविषयी जागृती निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. तशीच त्यांची मानसिकता कणखर बनवा जेणेकरून ते मित्रांच्या संगतीच्या दबावाला बळी पडणार नाहीत. आजकालच्या मुलांचा कल मौजमजा, आनंद घेण्याकडे आहे. दारू पिऊनच मौजमजा करता येते, अशी काहींची मानसिकता असते. पण मुलांमध्ये जर बौद्धिक आनंद घेण्याची क्षमता विकसित केली तर मुले दारूसारख्या फालतू गोष्टींकडे वळणार नाहीत.

यावेळी सूर्यकांत गावडे यांनी गोव्यातील आदिवासी समाजामध्ये व्यसनाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले. दारू व्यसनमुक्‍तीचे कार्यक्रम प्रत्येक गावागावांमध्ये होणे गरजचे आहे. दोन्ही संस्थांनी चालविलेले कार्य कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले. यावेळी गोपीनाथ गावस, नीलेश शेटकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात देवानंद गावडे यांनी स्वागत करून केली. दशरथ मोरजकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमली पदार्थ विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते संजय सावंत, सच्चीत सोलयेकर, शिक्षक पुंडलिक गावडे, अच्युत गावडे, नविंद्र गावडे, वैभव सोलयेकर, सुरेंद्र गावडे, महेश गावडे, राघलो सोलयेकर, प्रदीप गावडे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

 Tags : Goa, Prevent, them, first, taste, alcohol