Thu, Jun 20, 2019 00:57होमपेज › Goa › खनिज निर्यात शुल्क माफ करा

खनिज निर्यात शुल्क माफ करा

Published On: Dec 12 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 12:25AM

बुकमार्क करा

दाबोळी : प्रतिनिधी

 खाणी सुरू झाल्या  परंतु खनिज निर्यात सुरू झाली नसून, खनिज निर्यातीवर सरकारने लावलेले  30 टक्के शुल्क माफ करावे, अशी मागणी गोवा बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष रेमंड डिसा यांनी येथे  पत्रकार परिषदेत केली. 

गोवा बार्ज मालक संघटनेच्या वतीने वास्को येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी रेमंड बोलत होते. रेमंड म्हणाले, की  खनिज वाहतूक बंद झाल्याने बार्ज मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.   गोव्यातील खाणी 2012 साली बंद  होऊन खनिज निर्यात बंद झाल्याने खनिज व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. यामुळे बार्ज मालकांचे बरेच नुकसान झाले आहे. खनिज निर्यात  2016  मध्ये 2.84 दशलक्ष मेट्रींक टन होती. ती सध्या 0.68 दशलक्ष मेट्रींक टन वर पोहचली आहे.  निर्यात व्यवस्थित चालली होती त्यावेळी फायदा होता.  त्यावेळी 360 बार्जी व्यवसाय करायच्या परंतु खनिज  व्यवसाय बंद झाल्यामुळे अनेक बार्ज मालकानी नुकसानीमुळे बार्जेस विकल्या असून आता फक्त 180 बार्ज  शिल्लक  आहेत. राहिलेल्या बार्जींचे कर्ज फेडण्यासाठी सरकारने जी योजना जाहिर केली होती ती 31 डिसेंबर पर्यंत आहे.  परंतु अनेक जणांचे कर्ज थकीत असून ही योजना 31 मार्च 2018 पर्यंत वाढवून द्यावी.  

राष्ट्रीय बँकाकडून सरकारच्या योजने प्रमाणे 30 टक्के कर्जाची सवलत मिळाली. मात्र  सहकारी बँकाकडून अजून  तशी सवलत मिळाली  नाही. यासाठी सरकारने लक्ष घालून बँकेचे कर्ज ‘टेक ओहर’ करावे आणि सहा टक्के  व्याजाने कर्ज वसूली करावी. अशी मागणी त्यांनी केली. अतुल जाधव म्हणाले, की आमच्या बार्जीचा कार्गोसारखा वापर करून इतर व्यवसायासाठी उपयोग करून घ्यावा, त्यासाठी बार्ज मालक आपल्या बार्जी मध्ये बदल करू शकतील. सुरूवातीला बार्जमालकांचे कर्ज 363 कोटी होते.ते आता 100 कोटींवर पोचलेे असून अनेकानी बार्जी विकून कर्ज फेडले.   काहीजण  बार्जी  विकायच्या तयारीत आहेत.  

यावेळी बार्ज मालक संघटनेची खजिनदार राहूल नाईक, वकील गिरीक्ष सरदेसाई तसेच इतर सदस्य उपस्थित होते.