Tue, Jul 07, 2020 20:47होमपेज › Goa › मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Published On: May 22 2019 1:36AM | Last Updated: May 22 2019 1:36AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील उत्तर गोवा लोकसभेच्या एका जागेसाठी आणि मांद्रे, म्हापसा आणि पणजी या तीन विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गुरूवारी (दि. 23) सकाळी 8 वाजता आल्तिनो येथील सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणीस प्रारंभ होेणार आहे. लोकसभा आणि तीन विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी एकाचवेळी 11 कक्षांत सुरू होणार आहे. उत्तर गोवा लोकसभेच्या मतदारसंघातील 20 आणि तीन विधानसभा मतदारसंघातील एकूण 115 मतदान केंद्रातील ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील मतदान स्लिपांच्या प्रत्यक्ष मोजणीमुळे 23 मे रोजी निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर.मेनका यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

मेनका यांनी सांगितले की, आल्तिनो येथील सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयात ईव्हीएम असलेल्या ‘स्ट्राँगरुम’ला त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असून सीसीटीव्हीद्वारे चोवीस तास पहारा ठेवला आहे. येत्या गुरूवारी पहाटे 5 वाजता मतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी व  कर्मचार्‍यांना सभागृहात तैनात करण्यात येणार आहे. हा ‘स्ट्राँगरुम’ गुरूवारी सकाळी 7 वाजता उघडण्यात येणार असून 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे. सर्वात आधी टपाल मतमोजणी हाती घेतली जाणार आहे. 11 सभागृहात एकाचवेळी मांद्रे, म्हापसा, पणजी विधानसभा आणि एका लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम च्या मतमोजणीलाही सुरवात होणार आहे. प्रत्येक हॉलमध्ये 10 ते 14 टेबलांवर मतदारसंघनिहाय मतमोजणी करण्यात येणार आहे. एकूण 10 हॉलमध्ये मतमोजणीची 10 फेर्‍या होणार असून केवळ एकाच हॉलमध्ये एका मोजणीची फेरी केली जाणार आहे. 11 हॉलसाठी 11 केंद्रीय निरीक्षक असणार आहेत. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यासाठी 126 आणि दुसर्‍या टप्यासाठी 115 टेबल्स ठेवण्यात आली असून प्रत्येक टेबलावर तीन निवडणूक अधिकारी मिळून एकूण 469 कर्मचारी तैनात राहतील,असे मेनका यांनी सांगितले. 

महाविद्यालयाच्या वाचनालयात ‘मीडिया सेंटर’ स्थापण्यात आले असून उमेदवारांसाठीही स्वतंत्र कक्ष असणार आहे. या दोन्ही कक्षाशिवाय अन्य हॉलमध्ये मोबाईल अथवा कॅमेरा नेण्यास बंदी असल्याचेही मेनका यांनी सांगितले. 

प्रत्येक मतदान केंद्रातील ‘ईव्हीएम’ मतमोजणीला अर्धा तास लागणार असून ‘व्हीव्हीपॅट’मधील स्लिपांच्या मोजणीला साधारण एक तास लागण्याची शक्यता आहे. यंदा पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील मतदान स्लिपांची स्वतंत्र मोजणी होेणार आहे. ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील मतांची ‘ईव्हीएम’ मधील मतांशी जुळणी केली जाणार असून त्यात मेळ न बसल्यास फक्त ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील मते ग्राह्य धरली जाणार आहेत. 

अंतिम निकालास उशिराची शक्यता

प्रत्येक मतदारसंघातील ‘ईव्हीएम’ मतमोजणीला साधारण दोन तास लागणार असून हा निकाल 10 ते 11 पर्यंत समजणार आहे. मात्र ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील स्लिपांच्या मोजणीला पाच तास गृहीत धरता संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील स्लिपांच्या मोजणी मुख्य ‘ईव्हीएम’ मतमोजणीशी जुळल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर होणार असल्याने त्यासाठी रात्री उशीरही होण्याची शक्यता असल्याचे आर. मेनका यांनी सांगितले. 

उत्तर गोव्यातील 115 ‘व्हीव्हीपॅट’ मतांची मोजणी 

उत्तर गोवा लोकसभेच्या एका जागेसाठी 20विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 5 मतदान केंद्रातील मिळून 100 ठिकाणी, तसेच मांद्र, म्हापसा आणि पणजी या तीन विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 5 मतदान केंद्रातील 15 मिळून एकूण 115 मतदान केंद्रातील ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील मतदान स्लिपांची प्रत्यक्ष मोजणी करण्यात येणार आहे.