Fri, Apr 19, 2019 07:57होमपेज › Goa › वारसास्थळे दत्तक देण्याचे मनसुबे हाणून पाडू

वारसास्थळे दत्तक देण्याचे मनसुबे हाणून पाडू

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:53AMमडगाव : प्रतिनिधी

राज्यातील पुरातन वारसास्थळे दत्तक देण्याचा निर्णय चुकीचा असून, तो कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगून विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी वारसास्थळे बाहेरच्या लोकांना दत्तक देण्याच्या निर्णयाचा जोरदार विरोध केला. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणानंतर आता राज्यातील वारसास्थळे बळकावण्याचा केंद्र सरकारचा विचार असून केंद्र सरकारचे मनसुबे काँग्रेस पक्ष यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेले जुने गोवे चर्च तसेच राज्यातील इतर वारसास्थळे बाहेरील कंपन्यांना दत्तक देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर कवळेकर यांनी नाराजी व्यक्‍त केली. ते म्हणाले, केंद्र सरकारला गोव्यातील संपदा बाहेरच्या व्यावसायिकांना द्यायची आहे.असे झाल्यास राज्यातील जनतेचा आपल्याच पुरातन वारशावर अधिकार राहणार नाहीत. केपे मतदारसंघातील काब दे राम या पुरातन किल्ल्याचे नावदेखील या यादीत आहे. याविषयी बोलताना कवळेकर म्हणाले की, काब दे राम किल्ल्यात धार्मिक स्थळ आहे.तिथे धार्मिक कार्यासाठी स्थानिक लोक नियमितपणे जातात. हा किल्ला दत्तक म्हणून दिल्यास लोकांवर त्या ठिकाणी जाण्यास बंधने येतील, जुने गोवे येथील चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव ठेवण्यात आले आहे. भविष्यात गोंयच्या सायबाचे दर्शन लोकांना घेता येईल, की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.  

केंद्र सरकारने या वारसास्थळांची निगा राखण्यासाठी निधी पुरातत्व खात्याकडे द्यायला हवा होता. पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वारसास्थळे दत्तक देण्यामागे त्यांचा दुसराच हेतू असावा, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्ष केंद्र सरकारचा हा अंतस्थ हेतू साध्य होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत वारसास्थळे बाहेरच्या व्यक्तींच्या हाती जाऊ देणार नाही, असे  कवळेकर यांनी सांगितले.