Mon, Jun 17, 2019 03:25होमपेज › Goa › गोवा प्रवेशबंदी विरोधातील याचिका दुरुस्त करा; SC चे प्रमोद मुतालिक यांना निर्देश

गोवा प्रवेशबंदी विरोधातील याचिका दुरुस्त करा; SC चे प्रमोद मुतालिक यांना निर्देश

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 22 2018 1:02AMपणजी : प्रतिनिधी  

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांना गोव्यात प्रवेशबंदी विरोधात त्यांनी दाखल केलेली याचिका दुरुस्त करून सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल, सोमवारी दिले. त्याचबरोबर गोवा प्रवेशबंदी संदर्भात गोवा सरकारने जारी केलेली नवी अधिसूचनाही यावेळी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचिकेवरील पुढील सुनावणी ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 

गोवा सरकारने काहीतरी घोळ घालून आपल्या अशिलास राज्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्याबाबत नवा आदेश जारी केला असल्याचे  मुतालिक यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना  सांगितले. तर गोवा सरकारच्या वतीने मुतालिक यांच्या याचिकेला विरोध करून त्यांच्याविरोधात 50 गुन्हे नोंद असल्याची बाजू मांडली. मुतालिक यांच्यावर गोवा सरकारने 2014  पासून गोवा प्रवेश बंदी लागू केली आहे. या बंदीत दर दोन महिन्यांनी वाढ केली जात आहे. श्रीराम सेनेचा गोवा प्रवेश झाल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर राज्यातील शांततादेखील भंग होण्याची शक्यता व्यक्‍त करून सरकारने ही बंदी लागू केली आहे. 

श्रीराम सेनेच्या गोवा प्रवेशाला अनेकांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर   सरकारने ही बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.  उत्तर व दक्षिण गोव्यात ही बंदी लागू करण्यात आली आहे.