Thu, Apr 25, 2019 05:26होमपेज › Goa › गोव्याचा पॉप गायक रेमो फर्नांडिस निर्दोष

गोव्याचा पॉप गायक रेमो फर्नांडिस निर्दोष

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 07 2018 8:37AMपणजी : प्रतिनिधी

अल्पयवीन मुलीला अपशब्द वापरल्याच्या डिसेंबर 2015 मधील प्रकरणातून प्रसिद्ध पॉप गायक रेमो फर्नांडिस यांना गोवा बाल न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निवाड्याद्वारे निर्दोष मुक्त केले. बाल न्यायालयाच्या न्यायाधीश वंदना तेंडुलकर यांनी हा निवाडा दिला. रेमो फर्नांडिस यांची बाजू  अ‍ॅड. राजीव गोम्स यांनी  मांडली होती. रेमो यांचा पुत्र जोनाह यांच्या गाडीची 2 डिसेंबर 2015 रोजी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला धडक बसली होती.     

मालवण (महाराष्ट्र) तालुक्यातील ही मुलगी  जुने गोवेतील सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चच्या दिशेने जात होती. या अपघातात ती जखमी झाली होती. अपघातानंतर   अल्पवयीन मुलीला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार घेत असताना रेमो फर्नांडिस  यांनी तिची गोमेकॉत भेट घेतली व तिला शिवीगाळ केल्याची  तक्रार  तिने  आगशी पोलिसांत केली होती. 

पोलिसांनी या प्रकरणात गोवा बाल कायद्यांतर्गत  गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाच्या तपासावेळी  रेमो फर्नार्ंडिस तसेच त्यांचा पुत्र जोनाह यांना पोलिस स्थानकात बोलावून त्यांची जबानी नोंदवली होती. अपशब्द वापरल्याप्रकरणी रेमो फर्नांडिस यांच्याविरोधात आगशी पोलिसांनी  जवळपास एका वर्षांनंतर म्हणजेच 1 डिसेंबर 2016 रोजी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी बाल न्यायालयात सुरु होती. बाल न्यायालयाने रेमो फर्नांडिस यांना अल्पवयीन मुलीला अशब्द वापरल्याप्रकरणी निर्दोष ठरवून त्यांच्यावरील  सर्व आरोप रद्द केल्याचा निवाडा गुरूवारी दिला.