Fri, Jun 05, 2020 05:37होमपेज › Goa › गोवा फॉरवर्डकडून जनमत कौल दिनाचे राजकारण

गोवा फॉरवर्डकडून जनमत कौल दिनाचे राजकारण

Published On: Jan 19 2018 1:50AM | Last Updated: Jan 18 2018 11:14PMपणजी : प्रतिनिधी 

डॉ.जॅक सिक्‍वेरा यांचा  पुतळा विधानसभा संकुलात बसविण्याची मागणी करून मंत्री विजय सरदेसाई जनमत कौल दिनाचे राजकारण करत आहेत,अशी टीका  गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

गोवा फॉरवर्डने भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केल्याने ख्रिश्‍चन मतदारवर्ग दुखावला आहे. त्यांचे आता लांगुलचालन करण्यासाठी गोवा फॉरवर्डने जनमत कौल दिनाचे भांडवल करून विकृत राजकारण सुरू केले आहे, अशी टीकाही आनंद शिरोडकर यांनी केली.  मतांच्या राजकारणासाठी वेळोवेळी रंग बदलण्याच्या ह्या वृत्तीमुळे भावी काळात ना घरका ना घटका अशी स्थिती फॉरवर्डवर आल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

जॅक सिक्‍वेरा स्वत:च्या कर्तृत्वाने मोठे नेते झाले होते. त्यांचे मोठेपण सिध्द करण्यासाठी विजय सरदेसाईंच्या बेगडी प्रेमाची गरज त्यांच्या चाहत्यांना कधीच भासणार नाही. स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी ते जनमत कौल  दिनाचे भांडवल करत असल्याचे गोव्याच्या जागृत जनतेच्या लक्षात आले आहे,असेही शिरोडकर यांनी पत्रकात म्हटले आहे. 

विधानसभा संकुलात अन्य कोणाचाही पुतळा उभारणे म्हणजे गोव्याचे भाग्यविधाते  तथा पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांचा तो अपमान ठरेल. मगो पक्ष जरी आपल्या मूळ ध्येयापासून दूर गेला असला तरी भाऊसाहेबांचे हजारो चाहते विजय सरदेसाईंकडून भाऊसाहेबांचा होत असलेला अपमान कदापी सहन करणार नाहीत,असा इशारा  शिरोडकर यांनी दिला. 

जनमत कौल हा गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या परीक्षेची घडी होती. गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या बाजूने लोक होते.  कौल देताना जनतेवर राजकीय दबाव असू नये व स्वत:च्या मर्जीनुसार जनतेने मतदान करावे म्हणून स्वत: भाऊसाहेब व इतर मंत्र्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे देऊन सर्वसामान्यांप्रमाणे ते जनमत कौलाला सामोरे गेले होते. त्यामुळे इतर सर्व नेत्यांना डावलून फक्‍त जॅक सिक्‍वेरांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारणे म्हणजे हे  फक्‍त मतांचेच राजकारण आहे, असे  शिरोडकर यांनी म्हटले आहे.