Thu, Feb 21, 2019 21:19होमपेज › Goa › मद्यपी चालकांविरोधात पोलिसांची मोहीम

मद्यपी चालकांविरोधात पोलिसांची मोहीम

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 11 2018 1:19AMपणजी : प्रतिनिधी

मद्यपी वाहन चालकांविरोधात गोवा पोलिसांनी शुक्रवारी (दि.10) रात्री विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेसाठी सुमारे 200 पोलिस तैनात करण्यात आले होते. मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यासंदर्भातील आदेश पोलिस महासंचालक डॉ. मुक्‍तेेश चंदर यांनी जारी केले. संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.  पणजी, मडगाव, फोंडा, डिचोली, काणकोण, म्हापसा, पर्वरी आदी राज्यांतील विविध भागांमध्ये ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. सर्व पोलिसस्थानके व वाहतूक पोलिस स्थानकांचे कर्मचारी यात सहभागी झाले होते. यासाठी संबंधित पोलिस स्थानकांमधील अल्कोमीटरचा वापर वाहनचालकांनी मद्यपान केले की नाही याची तपासणी करण्यासाठी करण्यात आला होता.

महामार्गांबरोबरच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील ही मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार संध्याकाळच्यावेळी पणजी येथे सांतामोनिका जेटी, दिवजा सर्कल, जुने टायटन जंक्शन, 2 एसटीसी जंक्शन, सांतिनेझ जंक्शन  येथे  दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांची पोलिस तपासणी करीत असल्याचे दिसून  आले.

या तपासणी मोहिमेदरम्यान मद्यपान करुन वाहन चालवणार्‍यांची वाहने  यावेळी जप्‍त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या विशेष मोहिमेदरम्यान नक्‍की किती जणांवर कारवाई करण्यात आली याची माहिती मात्र समजू शकली नाही.