होमपेज › Goa › मास्तीमळ डोंगरकापणी विरोधात पोलिस कारवाई

मास्तीमळ डोंगरकापणी विरोधात पोलिस कारवाई

Published On: Dec 03 2017 12:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:36AM

बुकमार्क करा

काणकोण : प्रतिनिधी

मास्तीमळ येथील डोंगरकापणी शनिवारी काणकोण पोलिसांनी बंद पाडली व चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळाहून पोलिसांनी आठ ट्रक व एक जेसीबी जप्त केला. जप्त केलेल्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी दिली.

काणकोण नगरनियोजन कार्यालयाचे ड्राफ्टमन श्रीनिवास नाईक यांनी शुक्रवारी पोलिसात  येथील सर्व्हे क्र. 287/1 मध्ये डोंगरकापणी चालू असल्याची तक्रार केल्यावर ही कारवाई केली. मास्तीमळ भागात मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी चालू असूनही संबंधित खाते कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ नगर्से-पाळोळे कोमुनिदादचे सभासद शिवानंद नाईक गावकर यांनी मुख्य नगर नियोजकांकडे तक्रार केली होती. मास्तीमळ येथील ही जमीन पोर्तुगीज राजवटीत गुरांना चरण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. सुमारे 80 हजार चौरस मीटर जमीन दुसर्‍या लोकांच्या नावे कशी झाली, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात नगर्से-पाळोळे कोमुनिदादच्या सभासदांनी खटला दाखल केलेला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्याच्या खाण खात्याने माती काढण्यास कशी परवानगी दिली, असा प्रश्‍न नगर्से-पाळोळे कोमुनिदादच्या सभासदांनी उपस्थित केला आहे.