Tue, Jul 23, 2019 06:47होमपेज › Goa › पोलिसांची 315 मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई

पोलिसांची 315 मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMपणजी : प्रतिनिधी

गोवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री   विशेष मोहिमेअंतर्गत 315 मद्यपी वाहनचालकांविरोधात  कारवाई केली. मद्यपान करुन वाहन चालवणार्‍यांची वाहने व वाहनांची कागदपत्रे जप्‍त करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस सूत्रांनी दिली.या कारवाईत पर्वरी येथून एक एलपीजी सिलिंडर टेम्पो व मडगाव येथून मुंबई-गोवा बस जप्‍त करण्यात आली. या दोन्ही वाहनांच्या चालकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली.

मद्यपान तसेच वाहतूक नियमांचे उल्‍लंघन करून वाहने चालविणार्‍यांविरोधात गुन्हा नोंद करुन सदर प्रकरणे आता न्यायालयाकडे वर्ग केली जाणार आहेत. पोलिसांनी मद्यपी चालकांविरोधातील ही कारवाई  शुक्रवारी संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत  केली होती. 

या कारवाईत  पर्वरी येथे  पोलिसांनी 15 भरलेले एलपीजी  सिलिंडर  घेऊन जाणारा टेम्पो थांबवून चालकाची  तपासणी केली असता त्याने मद्यपान केल्याचे आढळून आले. त्यानुसार   सदर टेम्पो जप्‍त  करण्यात आला. अशा प्रकारे बेजबाबदार वागून अपघात किंवा अन्य दुर्घटना घडून मानवी जीवाला धोका पोचण्याची शक्यता असून संबंधित चालकाचा  चालक परवाना  रद्द करण्याची शिफारस वाहतूक खात्याकडे केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मडगावहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार्‍या बसवरदेखील कारवाई करण्यात आली. या बसमध्ये 20 प्रवासी होते व आणखीन 16 प्रवासी त्यात प्रवास करण्याच्या तयारीत होते. क्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरुन  प्रवाशांच्या जीवाला प्रवासादरम्यान धोका निर्माण  करणार्‍या   संबंधित बस चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याचेही वाहतूक पोलिस सूत्रांनी सांगितले.

100 ठिकाणी मोहीम

पणजी, मडगाव, फोंडा, डिचोली, काणकोण, म्हापसा, पर्वरी आदी विविध 100 ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली होती. पोलिस महासंचालक डॉ. मुक्‍तेश चंदर व  पोलिस महानिरीक्षक जस्पाल सिंग यांनी या मोहिमेची जातीने पाहणी केली. मद्यपी वाहनचालकांविरोधात  येत्या काही दिवसांत अशा प्रकारे आणखीन मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत, असे सांगण्यात आले.