Sat, Jun 06, 2020 20:28होमपेज › Goa › खाणप्रश्‍नी दोन महिन्यांत कृती आराखडा

खाणप्रश्‍नी दोन महिन्यांत कृती आराखडा

Published On: Aug 08 2018 1:48AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाणबंदी प्रश्‍नावर जुन्या कायद्यात दुरुस्ती करणे हाच एकमेव उपाय असून आवश्यक दुरुस्ती करू खाणी लवकरात लवकर सुरू करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी विनंती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री गटाला मंगळवारी केली. अन्य काही कायदेशीर पर्यायावरही चर्चा करण्यात आली असून येत्या दोन महिन्यांत कृती आराखडा जनतेसमोर ठेवला जाणार असल्याची माहिती खासदार नरेंद्र सावईकर यांनी दिली. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर आणि विनय तेंडुलकर यांचा समावेश होता. राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात खाणी सुरू करण्यासंबंधीत घेण्यात आलेल्या ठरावाची माहिती शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. मोदी यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे काळजीपूर्वक समजून घेतले. मोदी यांनी खाणबंदी समस्येवर तोडगा काढण्याचे ठोस आश्‍वासन देऊन याविषयी केंद्रीय मंत्रिगटाला सखोल माहिती देण्यासही सांगितले, अशी माहिती सावईकर यांनी दिली. 

पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्राने नेमलेल्या मंत्रिगटासोबत महत्वाची बैठक घेऊन गोव्यातील खाणप्रश्‍नाचे वेगळेपण अधोरेखीत केले. या बैठकीत सर्व उपस्थितांनी खाणबंदीवर कायदेशीरच तोडगा काढणे सोयीचे ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. यासाठी संबंधीत सर्व केंद्रीय मंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन राज्यातील खाणी लवकरात लवकर सुरू करण्याबाबत हालचाली करण्यासाठी मदत करण्याचे प्राथमिकरित्या मान्य करण्यात आले. या प्रश्‍नावर कायदेशीर पर्यायांचा विचार करून नेमके कोणते पाऊल टाकावे याबाबत विविध  केंद्रीय मंत्रालयांशी चर्चा करून तोडगा काढला जाण्याचे ठरविण्यात आले. यासंबंधी दोन महिन्यांत ठोस कृती आराखडा जाहीर करण्याचे ठरले असल्याचे सावईकर यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्रिगटाने गोवा विधानसभेने एकमताने घेतलेल्या ठरावाबाबत कायदा मंत्रालयाकडून तपासणी करून संसदेत 1987 सालचा खाण कायदा  दुरूस्त करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्रिगटाने सांगितले. पर्रीकर गुरूवारी अमेरिकेला उपचारासाठी जाणार असल्याने याबाबत पुढील  पाऊल पर्रीकर परतल्यानंतरच घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाला सांगितल्याचे सावईकर यांनी सांगितले. 

विकासकामांचीही पंतप्रधानांना माहिती : पर्रीकर

अमेरिकेत आजारपणावर उपचार घेऊन राज्यात परतलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ही दिल्लीला पहिली भेट आहे. पर्रीकर जून महिन्यात राज्यात आले असले तरी महत्त्वाच्या बैठका आणि 12 दिवसांच्या विधानसभेच्या कामात ते व्यग्र होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (दि.7) भेट घेऊन खाणबंदी तसेच राज्यातील विकासकामांबाबत त्यांना माहिती दिल्याचे दिल्लीहून पर्रीकर यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.

अनेक केंद्रीय मंत्र्यांशीही चर्चा

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची वैयक्‍तिक भेट घेतली. या बैठकीत सर्व मंत्रालयाचे सचिव, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कंठ उपस्थित होते.