Wed, Apr 24, 2019 15:50होमपेज › Goa › गोव्यात पेट्रोल, मद्य महागणार! 

गोव्यात पेट्रोल, मद्य महागणार! 

Published On: Feb 28 2018 12:04AM | Last Updated: Feb 28 2018 12:04AMपणजी : प्रतिनिधी

खाण बंदीमूळे राज्याच्या महसुलावर विपरित परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे सरकारी खात्यांच्या विविध शुल्कांमध्ये एप्रिल-2018 पासून वाढ करण्यात येणार आहे. पेट्रोलवरील ‘मूल्यवर्धित कर’  (व्हॅट) व मद्यविक्रीवरील करातही वाढ होण्याची शक्यता आहे.  कॅसिनोसंबंधी  शुल्कातही वाढ होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सरकारी सूत्रांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 16 मार्चपासून राज्यातील खनिज उत्खनन  पूर्णपणे बंद होणार असल्यामुळे राज्य सरकारला खनिज निर्यातीतून अपेक्षित महसूल येण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्री  पर्रीकर यांनीही खाणबंदीमुळे राज्याला सुमारे 400 कोटी रूपयांच्या महसुलाला मुकावे लागणार असल्याचे सूतोवाच याआधी केले होते. मात्र, या गोष्टीचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होऊ नये, म्हणून राज्याला महसूल प्राप्तीसाठी काही सरकारी शुल्कांमध्ये वाढ करण्यासह व्हॅटखाली येणार्‍या पेट्रोल व अन्य इंधनावरील कर वाढविण्याशिवाय सरकारकडे अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

येत्या मार्च महिन्यात सरकारी खात्याच्या वेगवेगळ्या फीमध्ये वाढ करण्याची तयारी सरकारच्या विविध खात्यांनी केली आहे. वाहतूक, सार्वजनिक बांधकाम, वीज, पंचायत, पालिका यासह विविध खात्यांमध्ये वेगवेगळ्या अर्ज प्रक्रिया, परवाने मिळविण्यासाठी आकारण्यात येत असलेल्या शुल्कातही वाढ होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली.   

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अर्थसंकल्प मांडताना नव्याने कर विषयक तरतुदी मांडलेल्या नाहीत. महसूल प्राप्तीतून 13,664 कोटी रुपये सरकारी तिजोरीत येतील, असे सरकारने म्हटले आहे. करातून महसूल प्राप्तीचा अंदाज 11,880 कोटी रुपये इतका आहे, तर 2,869 कोटी रुपये कर व्यतिरिक्त महसूल असेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

पेट्रोल व मद्याचे दर अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात कमी असल्याने पर्यटकांचा राज्यात मोठ्या प्रमाणात ओघ असतो. मात्र, सरकारी सूत्रांनुसार,   पेट्रोल व मद्याचे दर वाढले तर राज्यातील पर्यटनावरही काही अंशी परिणाम होण्याची भीती काही व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.