Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Goa › सभापतींच्या हस्ते नियोजित ध्वजारोहणाविरुद्ध याचिका 

सभापतींच्या हस्ते नियोजित ध्वजारोहणाविरुद्ध याचिका 

Published On: Aug 14 2018 1:04AM | Last Updated: Aug 14 2018 1:04AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थित पणजी येथे 15 ऑगस्ट रोजी होणार्‍या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय कार्यक्रमात सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार्‍या  ध्वजारोहणाविरोधात आरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. आयरीश रॉड्रिगीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली आहे.

अ‍ॅड. रॉड्रिगीस यांनी सादर  केलेल्या याचिकेत सदर प्रकरणाची स्वेच्छा दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदर याचिकेची प्रत भारताचे  सरन्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य  न्यायाधीश यांना पाठवण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थित ध्वजारोहण हे वरिष्ठ मंत्री किंवा  मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या  मंत्र्यांच्या हस्ते होणे आवश्यक आहे.  मात्र, मुख्यमंत्री  पर्रीकर यांच्या  अनुपस्थित  स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण  सभापती डॉ. सावंत यांच्या हस्ते होणे हे राजशिष्टाचार नियमांचे उल्‍लंघन ठरते. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी या याचिकेत अ‍ॅड. रॉड्रिगीस यांनी केली आहे.

सभापती ही स्वतंत्र अधिकारिणी असून ती सरकारचा भाग नाही.  त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांची जबाबदारी स्वीकारु शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने सदर प्रकरणी लक्ष देत स्वेच्छा  दखल घ्यावी, अशी विनंती अ‍ॅड. रॉड्रिगीस यांनी सादर केलेल्या याचिकेत केली आहे.