Fri, Jul 19, 2019 17:45होमपेज › Goa › ‘दूधसागर’ पर्यटक वाहतुकीस यापुढे स्थानिकांनाच परवानगी : पर्रीकर

‘दूधसागर’ पर्यटक वाहतुकीस यापुढे स्थानिकांनाच परवानगी : पर्रीकर

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 04 2018 12:10AMपणजी : प्रतिनिधी

दूधसागर धबधब्याकडे पर्यटकांना  घेऊन  जाण्यासाठी केवळ स्थानिकांच्या जीपगाड्यांना पुढील वर्षापासून परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत  शुक्रवारी  प्रश्‍नोत्तर तासात  सांगितले.सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर  यांनी दूधसागर येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलण्यात येत आहेत, या  प्रश्‍नावर मुख्यमंत्री बोलत होते.  

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, दूधसागर हे ठिकाण वन्यजीव संरक्षित क्षेत्र आहे. याठिकाणी मागील 150 ते 200 दिवसांत जवळपास 3 लाख 27 हजार 126 पर्यटकांनी भेट दिली. सदर ठिकाणाचा पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने   अभ्यास केला जाणार आहे. प्लास्टिक आदी निषिद्ध वस्तू परिसरात टाकण्यास बंदी असली तरी त्याठिकाणी कचरा फेकून घाण केली जात असल्याचेही  त्यांनी सांगितले.

दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना नेण्यासाठी जीपगाड्या उपलब्ध आहेत. मात्र या व्यवसायात काही परप्रांतीय लोकदेखील आले आहेत. केवळ स्थानिकांच्या जीप गाड्यांना  पुढील वर्षापासून परवानगी देण्यात येईल. 

दूधसागर ठिकाणी पर्यटन सुविधा तयार केल्या जातील. परंतु ते केवळ वन खात्याच्या मदतीने  करणे शक्य आहे. दूधसागर प्रमाणेच बोंडला, नेत्रावळी तसेच अन्य पर्यटनस्थळेही पर्यटकांसाठी खुली केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.