होमपेज › Goa › ‘एमपीटी’ला कोळसा हाताळणीची परवानगी 

‘एमपीटी’ला कोळसा हाताळणीची परवानगी 

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 30 2018 12:41AMपणजी : प्रतिनिधी

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत  ‘मुरगाव पतन न्यास’ला (एमपीटी) दरमहा एकूण 0.8 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) कोळसा हाताळणीसाठी परवानगी देण्यात आली.  ‘मे. साऊथ वेस्ट पोर्ट लि.’ (जेएसडब्ल्यू) आणि ‘मे. अदानी मुरगाव पोर्ट टर्मिनल प्रा. लि.’ या दोन्ही कंपन्यांना  दरमहा चार लाख टन कोळसा हाताळण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य सचिव लेविन्सन मार्टिन्स यांनी दिली. मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या 133 व्या बैठकीत सदर निर्णय  घेण्यात आला. 

मार्टिन्स म्हणाले की, ‘जेएसडब्ल्यू’ला याआधी कोळसा हाताळणीला देण्यात आलेली परवानगी जानेवारी-2018 मध्ये मागे घेण्यात आली होती. आता मंडळाने ही बंदी मागे घेताना ‘जेएसडब्ल्यू’ला नव्याने परवानगी दिली आहे.  त्यांना वर्षाला  55 लाख टन कोळसा हाताळणीची परवानगी होती. हे प्रमाण 48 लाख टन करण्यात आले आहे. मात्र,‘जेएसडब्ल्यू’च्या विरुद्ध  असलेला खटला सुरूच राहणार आहे. तसेच ‘अदानी’लाही आधी वार्षिक 52 लाख टन कोळसा वाहतुकीची असलेली मर्यादा कमी करून ती महिन्याला चार लाख टन करण्यात आली आहे.  डॉल्फिन जेटीवर  आणि बर्थ क्रमांक 10 आणि 11 वर कोणत्याही कोळसा हाताळणीला परवानगी देण्यात आली नाही.