Wed, Apr 24, 2019 07:33होमपेज › Goa › पर्येतील लोकांची पाण्यासाठी धावपळ

पर्येतील लोकांची पाण्यासाठी धावपळ

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AM
वाळपई : प्रतिनिधी 

पर्येतील घोलवाडा येथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत असून गेल्या अनेक वर्षांपासून येथील लोकांना टँकरच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. जवळील वाळवंटी नदीमध्ये पाण्याचा प्रचंड साठा असूनसुद्धा त्या पाण्याचा लोकांना पिण्यासाठी वापर करता येत नाही.

राज्यातील लोकांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे पाणीपुरवठा खात्याचे धोरण पूर्णपणे निष्फळ ठरले आहे. या भागातील पाणी टंचाईबाबत महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सत्तरी व डिचोली तालुक्याला जोडणारा पर्ये हा महत्त्वाचा भाग असून वाळवंटी नदीच्या काठावर वसलेल्या पर्येतील घोलवाडा येथील लोकांचे पिण्याच्या पाण्याविना हाल होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नळजोडणीच्या प्रतीक्षेत असलेले येथील लोक पाणी टंचाईला कंटाळले आहेत.  

पर्येतील घोलवाडा या ठिकाणी एकूण 100 घरे आहेत. येथील लोकांना साखळीतील पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा करण्याची योजना होती. मात्र, येथील सदर घरे बर्‍याच उंचीवर असल्याने त्याठिकाणी पाणी चढू शकत नाही. त्यामुळे येथील पाणी समस्या सोडवण्यासाठी येथील लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील लोकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांना रोज आपल्या घरातील भांडी रस्त्यावर आणून ठेवावी लागतात. सरकारने 24 तास पाणी देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, या आश्‍वासनपूर्तीकडे सरकारने गांभीर्याने पाहिलेले नसल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे. 

घोलवाडा येथील पिण्याची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी याठिकाणी जलकुंभ उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, या प्रस्तावाला अजूनपर्यंत मान्यता न मिळाल्याने 100 घरांतील लोकांना दररोज आपल्या घरातील भांडी घेऊन टँकरची वाट बघत रांगेत उभे रहावे लागत आहे. गावापासून अवघ्याच अंतरावर असलेल्या वाळवंटी नदीमध्ये मुबलक पाणीसाठा असून पर्ये पंचायत भागासाठी जल शुद्धीकरण प्रकल्प उभारल्यास सर्व गावांना चोवीस तास पाणीपुरवठा होऊ शकेल.

मात्र, याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या भागाचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी याठिकाणी स्वतंत्र जलकुंभ उभारण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. पाठपुरावा करूनसुद्धा याठिकाणी जलकुंभ उभारण्यास सरकारने कोणत्याच हालचाली न केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. सत्तरी तालुक्यातील वेगवेगळ्या भागांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सत्तरी तालुक्यातील अनेक गावे टँकरमुक्त कधी होणार, असा प्रश्‍न लोक उपस्थित करत आहेत.

सत्तरी तालुक्यातील विविध गावांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कार्यान्वित केलेल्या प्रकल्पांचे व्यवस्थित नियोजन होताना दिसत नाही. दाबोस पाणी शुद्धीकरण प्रकल्प ते ठाणे दरम्यान 9 कोटी रुपये खर्चून घातलेल्या नवीन जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा करण्यात आला असला तरी अजूनही ठाणे पंचायत क्षेत्रातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी सत्तरीतील अनेक गावांमधील लोकांनी गेल्या दोन महिन्यांत बर्‍याचदा वाळपईच्या पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चे आणले होते. नवीन जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्यानंतर ठाणे पंचायत क्षेत्रातील सर्व गावे टँकरमुक्‍त होणार असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. 

मात्र, सदर जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू झाला असला तरी अद्यापही काही गावातील लोकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. दर दिवशी शंभर टँकरद्वारे सत्तरी तालुक्यातील विविध गावांत पाणी पुरवठा केला जात आहे. गोव्याची जीवनदायनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या म्हादई नदीचे पात्र पाण्याने भरलेले असताना तालुक्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणे हे दुर्दैव आहे. 

दाबोस पाणी शुद्धीकरण प्रकल्प 35 एम.एल.डी क्षमतेचा असून त्याचबरोबर गुळेली नगरगाव, आदी भागांमध्ये पाणी पुरवठा खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र असे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सध्या तरी सदर प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेळ्या गावांना पाण्याचा पुरवठा करण्यात येत असला तरी अजूनही बर्‍याच गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याबाबत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. 

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिसुर्लेतील प्रत्येक घराला 500 लिटर पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिल्यानंतर सदर ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टँकरची गरज आहे. केरी पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून सदर पाण्याचा पुरवठा या गावाला करण्यात येणार आहे.