Mon, Apr 22, 2019 05:43होमपेज › Goa › रेती माफियांना अटक करा 

रेती माफियांना अटक करा 

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 10 2017 11:29PM

बुकमार्क करा

पेडणे : प्रतिनिधी 

उगवे ग्रामस्थ प्रभाकर महाले यांना मारहाण करणार्‍यांना त्वरित अटक करा, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा उगवे ग्रामस्थांनी रविवारी पेडणे पोलिस स्थानकावर काढलेल्या मोर्चावेळी दिला. उगवे खाडीत  चालणारा बेकायदा रेती व्यवसाय पूर्णपणे बंद करावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

पेडणे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले की, लवकरच संशयितांना अटक केली जाईल, उगवेवासीयांनी केवळ उगवे परिसरातील बेकायदा रेती उत्खननावर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. मात्र, आपण पूर्ण पेडणे तालुक्यातील बेकायदा रेती उपसा बंद करू.

उगवे येथील श्री माऊली देवीचा दि. 9 रोजी जत्रोत्सव झाला. जत्रेचे जागरण रविवारी होते. शिवाय हिशोबाची बैठक होती, त्यामुळे गावकरी उगवे मंदिरात जमले. या बैठकीते ग्रामस्थाला झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करून संशयितांना पोलिसांनी अटक  करावी, या मागणीवर चर्चा झाली. पेडणे पोलिस स्थानकावर धडक देण्याचाही  निर्णय झाला. त्यानंतर उपस्थितांनी मिळेल त्या वाहनाने पेडणे पोलिस स्थानक गाठले.

रेती माफियाने उगवे येथील प्रभाकर महाले यांचे दि. 8 रोजी अपहरण करून त्यांना जबर मारहाण केली होती. त्याविषयी उगवे ग्रामस्थांनी  दिलेल्या तक्रारीस  अनुसरून थॉमस फर्नांडिस, रिचर्ड फर्नांडिस तसेच आठ अज्ञातांवर गुन्हा नोंदवला आहे, असे पोलिस निरीक्षक चोडणकर यांनी सांगितले.

माजी सरपंच विनायक महाले, शशिकांत महाले, रामदास महाले, विठू महाले यांच्यासह ग्रामस्थांचे शिष्टमंडळ पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर  यांच्याशी चर्चेसाठी गेले . दरम्यान, पोलिस निरीक्षक चोडणकर यांनी बाहेर येऊन प्रभाकर महाले यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून संशयितांना लवकरच पकडले जाईल, असे आश्‍वासन दिले.

रामदास महाले यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून उगवे खाडीत बेकायदा रेती उपसा चालू आहे. या प्रकारामुळे नदीचे पात्र रुंदावत चालले असून बागायतीतील हजारो झाडे वाहून गेली. त्यामुळे गावच्या अस्तित्वाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. श्याम महाले यांनी सांगितले की, या बेकायदा रेती माफीयांना  पोलिसांचा वरदहस्त आहे, मंत्र्यांचाही पाठिंबा आहे, परिणामी पोलिस गुन्हेगारांनाच संरक्षण देतात.