होमपेज › Goa › पेडणे तालुक्याला वर्षभरात मुबलक पाणी 

पेडणे तालुक्याला वर्षभरात मुबलक पाणी 

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 03 2018 11:40PMहरमल : वार्ताहर   

पेडणे व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांना भेडसावणारी पाण्याची  समस्या सुटावी यासाठी चांदेल येथे नवीन 20 एमएलडी क्षमतेचा पाणी प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीस प्रतीदिनी 135 लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यात आले असून येत्या वर्षभरात पेडणे तालुक्यांतील प्रत्येक घराला मुबलक पाणीपुरवठा केला जाईल,  अशी  घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर  यांनी केली.

मांद्रे मतदारसंघातील तीन कोटी खर्च करून पूर्ण केलेल्या व सध्या वाहतुकीस खुला असलेल्या मांद्रे-जुनस व म्हारचीकोंड -आश्‍वे बायपास पुलाचे उद्घाटन मंगळवार दि.2 मे रोजी  मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री ढवळीकर बोलत होते.  मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे, मोरजी जिल्हा पंचायत सदस्या  श्रीमती मांजरेकर, मांद्रे सरपंचा राजवी सावंत, हरमल सरपंच अनंत गडेकर, पालये सरपंच उदय गवंडी, मोरजी सरपंचा शांती पोके, अगरवाडा-चोपडें सरपंच संगिता नाईक, विर्नोडा सरपंच शरद गावडे, केरी-तेरेखोल सरपंच नमिता केरकर, उपसरपंच डेनिस ब्रिटो उपस्थित होते.

मंत्री ढवळीकर म्हणाले, की माजी मुख्यमंत्र्यांनी धारगळ आणि तुये येथे कुठलेही कागदोपत्री सोपस्कार पूर्ण न करता 30 एमएलडी पाणी प्रकल्प  सुरू केला असल्याने ते काम बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत 20 एमएलडी पाणी प्रकल्प पेडणे तालुक्यात  कार्यान्वित होत नाही तोपर्यंत 30 एमएलडी पाणी प्रकल्पाचे काम पुढे नेले जाणार नाही. येत्या मे अखेरपर्यंत मांद्रे मतदारसंघांतील 14 कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात यावीत, असे आदेश खात्याच्या अधिकार्‍यांना दिले.

पेडणे तालुक्यांत काही कंत्राटदार सरकारची कामे घेऊन वर्षांनुवर्षे रेंगाळत ठेवतात, लोकांच्या गरजांकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. अशा कंत्राटदारांना मंत्र्यांनी कानपिचक्या द्याव्यात आणि सामान्य जनतेची कामे मार्गी लावण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मंत्री  ढवळीकर यांच्याकडे  आमदार दयानंद सोपटे  यांनी  केली. दिलेल्या मुदतीपूर्वीच पुलांचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल मंत्री ढवळीकर, अभियंते कंत्राटदार यांचे अभिनंदन केले. दोन्ही पुलाला लागून असलेली गटारांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करावी, अशी मागणी आमदार सोपटे यांनी केली.सरपंच रावजी सावंत यांनी स्वागत केले. महादेव हरमलकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप हडफडकर यांनी  आभार मानले.

वर्षभरात जुन्या पुलांची डागडुजी

राज्यातील मुख्य मार्गावर असलेल्या सर्व लहान-मोठ्या पुलांचे खात्याकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. जुन्या व कमकुवत झालेल्या पुलांच्या  दुरुस्तीचे काम हाती घेण्याची गरज आहे. जुन्या पुलांची डागडुजी येत्या वर्षभरांत केली जाईल, असे  मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

Tags : Goa, Pedne taluka, abundant, water, throughout, year