Wed, Aug 21, 2019 15:00होमपेज › Goa › राज्यात काँग्रेसतर्फे शांततापूर्ण जागृती 

राज्यात काँग्रेसतर्फे शांततापूर्ण जागृती 

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 11:46PMपणजी : प्रतिनिधी

राष्ट्रीय काँग्रेसने पेट्रोल, गॅस सिलिंडर आणि अन्य इंधन  दरवाढीविरोधात सोमवारी (दि.10) देशव्यापी बंद पुकारला आहे. मात्र,चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात प्रदेश काँग्रेसतर्फे बंदऐवजी शांततापूर्ण मार्गाने जनजागृती केली जाणार आहे. यासाठी चाळीसही मतदारसंघांतील मुख्य पेट्रोलपंप परिसरात पक्षाचे कार्यकर्ते पत्रके वाटून जागृती करणार आहेत. महागाईच्या निषेधार्थ म्हार्दोळ येथील पेट्रोलपंपावर बैलगाडीतून कार्यकर्ते दाखल होणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. 

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर आदीच्या दरात केंद्र सरकारने सातत्याने वाढ करून महागाईचा उच्चांक गाठल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय स्तरावर ‘भारत बंद’ पुकारला आहे. मात्र, गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात हा बंद न पाळण्याचे धोरण  पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने ठरविले आहे. त्याऐवजी जनतेला पत्रकांचे वाटप करून जागृत करण्यासाठी काँग्रेसच्या युवा, महिला, सेवादल, विधीमंडळ   गट आदींना कामे वाटून दिलेली असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. 

चोडणकर म्हणाले की,  सोमवारचे काँग्रेसचे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने केले जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील आमदार अथवा प्रमुख नेते आपापल्या भागात प्रचाराचे नेतृत्व करणार आहे. मडगावात आपण स्वत: आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, पणजीत पक्षाचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार, फोंडा येथे आमदार रवी नाईक या निदर्शनाचे नेतृत्व करणार आहेत.