होमपेज › Goa › पर्यटनमंत्र्यांचा निर्णय : आगामी पर्यटन हंगामापासून कार्यवाही

किनार्‍यांवर रात्रीदेखील गस्त

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:16AMपणजी : प्रतिनिधी 

किनार्‍यांवर घडणार्‍या अनुचित घटना टाळून गोव्याची  छबी  सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून पर्यटकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी राज्यातील सर्व किनार्‍यांवर दिवसाप्रमाणेच रात्रीही गस्त घालण्याचा निर्णय पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी घेतला आहे. पर्यटनमंत्र्यांनी  खात्याच्या अधिकार्‍यांसमवेत नुकतीच बैठक घेऊन हा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी आगामी पर्यटन हंगामापासून होणार आहे.पर्यटन खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे, जागृती मोहीम  हाती  घेण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे म्हटले आहे. 

आगामी पर्यटन हंगामात या सर्व उपाययोजनांची यशस्वी अंमलबजावणी केली जाईल. किनार्‍यांवर अहोरात्र गस्त घालण्याबरोबरच पर्यटकांनी खबरदारीच्या सूचना घेण्यासंदर्भातील फलकही किनार्‍यांवर तसेच   महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर उभारण्यावर चर्चा झाल्याचे  पत्रकात म्हटले आहे.

‘दृष्टी मरिन’ने किनार्‍यांवर  कडक गस्त घालावी.  सूर्यास्त तसेच  सूर्योदय या कालावधीत पर्यटकांनी पाण्यात जाऊ नये, यासाठी त्यांच्यावर देखरेखीसाठी आवश्यक असलेली वाहने, उपकरणांसाठी सहकार्य केले जाईल, असेही मंत्री आजगावकर यांनी म्हटले आहे.

या पर्यटनमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला  शॅक व्यावसायिक  उपस्थित होते. त्यांना आगामी पर्यटन हंगामात शॅक्सना  सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर  किनार्‍यावरील फिरत्या विक्रेत्यांना प्रोत्साहन देऊ नये, तसेच खवळलेल्या सुमद्रात जाण्यापासून लोकांना रोखावे, असेही शॅक्स व्यावसायिकांना सांगण्यात आले. 

या बैठकीत गावपातळीवर समिती स्थापन करून त्यात पर्यटन घटक, पोलिस तसेच पर्यटन खात्याच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समावेश करावा. सदर समितीला त्यांच्या हद्दीत असलेल्या किनार्‍यांवर घडणार्‍या गोष्टींना जबाबदार धरावे, अशीही या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत पर्यटन खात्याचे संचालक मिनीनो डिसोझा, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे संचालक निखिल देसाई व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते. 

टुरिस्ट ट्रेड कायद्यात दुरुस्ती शक्य

विधानसभेच्या येत्या अधिवेशनात  पर्यटन खाते ‘टुरिस्ट ट्रेड’कायद्यात दुरुस्ती सुचवेल. या दुरुस्तीद्वारे या कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना दंड आकारण्याच्या बाबीचा समावेश असेल. किनार्‍यावर मद्यपान करणे,  किनार्‍यावर वाहन चालवणे हादेखील गुन्हा ठरवावा,  यासाठी दुरुस्ती सुचविण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्र्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

तक्रारींसाठी व्हॉटस्अ‍ॅप सुविधा

पर्यटनाशी संबंधित कुठल्याही प्रकारच्या नियम उल्लंघनाची माहिती  देण्यासाठी पर्यटन खात्याकडून व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक सुविधा सुरू करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. सदर व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक पोलिसांशी लिंक केला जाईल. त्यावर येणार्‍या उल्लंघनाच्या तक्रारीच्या आधारे   कारवाई केली जाईल. याशिवाय पर्यटन खात्याला बीच वॉर्डनची संख्या वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.