Sun, Jul 21, 2019 01:25होमपेज › Goa › बसुराज खून प्रकरणातील संशयित पंकज पवार निलंबित

बसुराज खून प्रकरणातील संशयित पंकज पवार निलंबित

Published On: May 18 2018 1:38AM | Last Updated: May 18 2018 1:31AMमडगाव : प्रतिनिधी

कुडचडेतील बसुराज बाकडी खून प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित पंकज पवार याला सेवेतून निलंबित करण्यात आले. याबाबतचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अंजली शेरावत यांनी  जारी केला आहे.

पवार हा धारबांदोडा मामलतदार कचेरीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत होता. बसुराजचा खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यापासून ते सर्व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंत सर्व घटनांत पवारचा सहभाग आढळल्याने कुडचडे पोलिसांनी त्याला अटक केली होती.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी अंजली शेरावत यांनी दिलेल्या माहितीनुसार बसुराज हत्या प्रकरणी अटकेनंतर पंकजची 24 तासांत  जामिनावर सुटका झाली नाही. नियमानुसार त्याच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवार याचे बसुराज याची पत्नी कल्पना हिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. बसुराजचा खून करण्याच्या कटात त्याचा सहभाग आढळून आला आहे.

बसुराजची पत्नी तथा संशयित कल्पना बाकडी, अब्दुल शेख, सुरेश कुमार आणि पंकज पवार यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आदित्य गुजर हा या प्रकरणातील प्रमुख संशयित आहे. बसुराज याचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते अनमोड घाटात फेकण्यामागे गुजर याचा  हात असल्याचे चौकशीत समोर आले असून  त्याच्या शोधासाठी पोलिस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक परराज्यात पाठविण्यात आले आहे.