होमपेज › Goa › ‘आयटक’चे पणजीत धरणे आंदोलन

‘आयटक’चे पणजीत धरणे आंदोलन

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 26 2018 12:01AMपणजी : प्रतिनिधी

देशाच्या 69 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर गोवा आयटकतर्फे लोकशाही वाचवा संविधान वाचवा, असा नारा देत  पणजी बसस्थानक येथील क्रांती सर्कल येथे धरणे  आंदोलन करण्यात आले. 
आयटकचे कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेको, अ‍ॅड. सुहास नाईक, अ‍ॅड. प्रसन्ना उटगी यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणे आंदोलन  करण्यात आले. 

अ‍ॅड. नाईक म्हणाले, की भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. अनेक दशकांपासून भारत प्रगती करीत आहे. मात्र, मागील साडेतीन वर्षांपासून  केंद्रातील एनडीए सरकारच्या काळात बीफ, लव्ह जिहाद, भ्रष्टाचार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, जीवनाश्यक वस्तूंच्या दरात वाढ, कामगार वर्गावर  भांडवलदारांकडून होणारे हल्ले आदी समस्यांनी तोंड वर काढले आहे. परंतु याकडे सरकार डोळेझाक करीत आहे.  

डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रा. कलबुर्गी, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणांमुळे लोकशाहीला धक्का बसला आहे. सरकारने जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जपणे आवश्यक आहे. परंतु तसे होताना दिसून येत नाही. हे देशाच्या लोकशाहीला व संविधानाला घातक ठरु शकते. त्यामुळे देशाच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर   गोवा आयटकतर्फे लोकशाही वाचवा संविधान वाचवा, या मागणीसाठी   गोवा आयटकतर्फे हे धरणे आंदोलन  करण्यात आल्याचेही नाईक यांनी सांगितले.