Tue, Apr 23, 2019 00:33होमपेज › Goa › कार्निव्हलसाठी पणजी सज्ज

कार्निव्हलसाठी पणजी सज्ज

Published On: Feb 07 2018 1:37AM | Last Updated: Feb 07 2018 12:06AMपणजी : प्रतिनिधी

‘ खा प्या मजा करा’  असा संदेश देणार्‍या किंग मोमों ची राजवट  राजधानीत शनिवारी 10फेब्रुवारी पासून सुरू होणार असून कार्निव्हलसाठी राजधानी सज्ज झाली आहे. कार्निव्हल महोत्सवाचे ठिकाण यंदा बदलण्यात आले असून यंदा मिरामार दोनापावला मार्गावर ही फेरी पहायला मिळणार आहे.  

 गोवा पर्यटन  खाते  आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ तर्फे  आयोजित कार्निव्हल निमित्त पणजी शहरात   ठिकठिकाणी  सजावट करण्यात आली आहे. यानिमित्ताने दिवजा सर्कल, मिरामार दोनापावल मार्गावर, गोवा विज्ञान केंद्राजवळ  रोषणाईचे काम सुरू आहे. विद्युत रोषणाई, रंगबिरंगी मुखवटे, पताका, बॅनर्सनी राजधानीला सजविण्यात आले आहे. यंदा  ‘किंग मोमो’ म्हणून  उत्तोर्डा येथील ब्रुनो आझारेदो यांची  निवड करण्यात आली आहे. 

कार्निव्हल  मिरवणुकीसाठी गोवा विज्ञान केंद्राजवळ भव्य असा मुखवट्यांचा देखावा उभारण्यात आला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी सजावटीचे काम  सुरू आहे. मिरामार सर्कल पासून सजावट बघायला मिळते. शनिवारी  संध्या. 3.30 वाजता  ‘व्हिवा कार्निव्हल’ च्या गजराने पणजीत कार्निव्हल चित्ररथ मिरवणूकीला सुरूवात होईल. 

विविध आकाराचे भव्य चित्ररथ कार्निव्हल मिरवणुकीचे दरवर्षी आकर्षण ठरतात. कार्निव्हल मिरवणूकीत सहभागी चित्ररथ विविध सामाजिक विषयांवर  जागृती करतात. कार्निव्हलचे चित्ररथ उभारण्याचे कामही  सध्या सुरू  आहे. कार्निव्हलची मिरवणुकीवेळी सादर करण्यात येणारी लोकनृत्य, नाच गाण्यांची तयारी  जोरात सुरू आहे.

 कार्निव्हलच्या  पार्श्‍वभूमीवर  पणजी शहरात सर्वत्र चोख  पोलिस बंदोबस्त  ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक रस्त्यावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून  देखरेख टॉवरही उभारण्यात येतील. कार्निव्हल मिरवणूकीत मजा  लुटण्यासाठी स्थानिक लोकांबरोबरच  देशी विदेशी पर्यटक  मोठ्या संख्येने दाखल  होणार आहेत.